अवघ्या 50 भाविकांच्या उपस्थित यंदा तुकोबांचा बीजसोहळा

हूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथे जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा निवडक भाविकांमध्ये (50) संपन्न करण्यासंदर्भात उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांनी आढावा बैठक घेतली. श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष-विश्‍वस्त यांच्या उपस्थीत मुख्य मंदिराच्या कार्यालयात मंगळवारी (दि. 16) आढावा घेण्यात आला.

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा दोन आठवड्यावर (मंगळवार, दि. 30) येऊन ठेपला आहे. बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचे तीर्थक्षेत्र देहूत आगमन होत असते. पिंपरी-चिंचवड, पुणे यासह अन्य भागात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा भाविकांच्या मोठ्या संख्येत होणारा सोहळा रद्द करून निवडक भाविकांमध्ये संपन्न करण्यासाठी नियोजन व चर्चा करण्यासाठी मंगळवारी सकाळी मुख्य मंदिराच्या कार्यालयांमध्ये बैठक झाली.

या वेळी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, हवेलीचे अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, देहू नगरपंचायतीचे प्रशासक तथा मावळ तहसीलदार मधुसुदन बर्गे, संस्थानचे अध्यक्ष हभप मधुकर महाराज मोरे, विश्‍वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, मंडलाधिकारी शेखर शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, तलाठी अतुल गीते, पोलीस पाटील चंद्रसेन टिळेकर, सुभाष चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

करोनाचा वाढता प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी तसेच भाविकांमध्ये प्रसार होऊ नये यासाठी सुरक्षितता आणि उपाययोजना करण्यासाठी बीज सोहळा निवडक 50 भाविकांमध्ये संपन्न करण्यात यावे. नागरिकांनी भाविकांनी घरी राहूनच बीज सोहळा साजरा करावा.देहूत येणाऱ्या सर्व रस्त्यांवर रविवारी (दि. 28) मध्यरात्री 12. 00 वाजल्यापासून ते गुरुवारी (दि. 31) मध्यरात्रीपर्यंत नाकाबंदी तसेच जमावबंदी करण्यात येणार असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक, दिंड्या, फडकरी, वीणेकरी आदींनी तीर्थक्षेत्र देहू येथे येऊ नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

बीज सोहळ्यासाठी होणारे विविध विधी धार्मिक कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना पोलीस प्रशासन व संस्थान यांच्या वतीने छायाचित्र असणारे ओळखपत्र देण्यात यावे. याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठविण्याची चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या आदेशान्वये बीज सोहळा संपन्न होईल, असे सांगण्यात आले.

शासनाने करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घातलेले निर्बंध नागरिकांनी पाळावे तसेच मास्कचा वापर करावा, साबणाने वारंवार हात धुवावे आणि सुरक्षित अंतर ठेवावे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

You May Also Like

error: Content is protected !!