आठवी नापास व्यक्तीने केले ब्लेडने केले महिलेचे सिझेरियन, आईचा व बाळाचा मृत्यू

उत्तर प्रदेश राज्यात दररोज वेगवेगळ्या भयंकर घटना समोर येत असतात. नुकतंच सुलतानपूर जिल्ह्यातील सैनी गावातील एका नर्सिंग होममध्ये आठवी नापास शिक्षण असलेल्या व्यक्तीने चक्क महिलेवर सिझेरियन पद्धतीने प्रसूती केली. यात त्या महिलेचा व तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. राजेंद्र शुक्ला असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याला व रुग्णालयाचे मालक राजेश साहानी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पूनम नावाच्या महिलेला बुधवारी प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तिचा नवरा राजारामने तिला माँ शारदा नर्सिंग होममध्ये दाखल केले. हे रुग्णालय सैनी गावातच होते. मात्र या रुग्णालयात शस्त्रक्रीयेसाठी लागणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नव्हत्या. पूनम प्रसूतीसाठी रुग्णालयात आल्यानंतर तिचे सिझेरियन करण्याचा निर्णय शुक्ला याने घेतला. मात्र सिझेरियनसाठी लागणारी साधनं नसल्याने शुक्लाने साध्या ब्लेडने तिच्यावर शस्त्रक्रीया केली. मात्र शस्त्रक्रियेनंतर पूनमचा रक्तप्रवाह थांबला नाही. त्यानंतर शुक्लाने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र आसपास कोणतेही रुग्णालय नसल्याने राजाराम तिला 140 किमी अंतरावर असलेल्या लखनौ येथील रुग्णालयात घेऊन गेला. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्याआधी जन्मानंतर योग्य उपचार न मिळाल्याने तिचे बाळही दगावले होते.

या प्रकरणी राजारामने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाची तपासणी केली असता त्यांना धक्काच बसला त्या रुग्णालयात एकही डॉ़क्टर नव्हता. आया, दोन नर्स व वॉर्ड बॉय हे सर्जरी करायचे. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाला टाळे ठोकत राजेंद्र शुक्ला व साहानी यांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

You May Also Like