कोरोना व्हायरसची दुसरी लाट रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींची पंचसूत्री

नवी दिल्ली: देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व राज्यांमध्ये सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेचे कौतुक केले. तसेच राज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस योजना तयार करुन कामाला लागावे, असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले.

भारत गेल्या वर्षभरापासून कोरोनाविरुद्ध लढत आहे. आपण ज्याप्रकारे कोरोनाशी लढत आहोत तो जगासाठी एक आदर्श वस्तुपाठ झाला आहे. आजच्या घडीला देशभरात 96 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील मृत्यूदरही कमी असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी त्यांनी राज्यांना काही उपायही सांगितले.

पंतप्रधान मोदींनी राज्यांना कोणती पंचसूत्री दिली?

1. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील 70 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वृद्धीदर 150 टक्के इतका आहे. कोरोनाची ही दुसरी लाट आपल्याला थोपवायला पाहिजे. यासाठी आपल्याला ठोस आणि वेगाने निर्णय घ्यावे लागतील.

2. आपण कोरोनाविरुद्ध मोठ्या लढाईनंतर निर्णायक टप्प्यावर पोहोचलो आहोत. याठिकाणी आत्मविश्वासाचे रुपांतर बेजबाबदारपणात होता कामा नये. जनतेमध्ये तणाव निर्माण होता कामा नये आणि त्यांना त्रासापासून मुक्तीही मिळायला हवी.

3. टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट ही त्रिसूत्री गेल्या वर्षभरात प्रभावीपणे राबवली गेली. आतादेखील त्याची तितक्यात गंभीरतेने अंमलबजावणी झाली पाहिजे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला पाहिजे. तसेच RT-PCR टेस्ट चे प्रमाण कायम 70 टक्क्यांपेक्षा जास्त राहिले पाहिजे.

4. लहान शहरांमध्ये आपल्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवायला हवे. छोट्या शहरांमध्ये रेफरल सिस्टीम आणि रुग्णवाहिकांचे नेटवर्क वाढवण्यावर भर दिला पाहिजे.

5. देशातील लसीकरणाची गती सातत्याने वाढत आहे. आपण एका दिवसात 30 लाख लोकांना लस देण्यापर्यंतची मजल मारली आहे. मात्र, लसीच्या काही मात्रा फुकट जात आहेत. हे प्रमाण कमी झाले पाहिजे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही प्रतिबंधक लस महत्त्वाचे हत्यार आहे. त्यामुळे लसीचा अपव्यय टाळणे गरजेचे असल्याचे मोदींनी सांगितले.

You May Also Like