कोहलीची खेळी व्यर्थ, इंग्लंडची मालिकेत आघाडी

अहमदाबाद – सलामीवीर जोस बटलर व जॉनी बेअरस्टो यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा तिसऱ्या टी-20 सामन्यात 8 गडी राखून पराभव केला व पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना बटलरने सुरुवातीपासूनच धडाक्‍यात सुरुवात केली. दुसरा सलामीवीर जेसन रॉय लवकर बाद झाल्यानंतर बटलरने डेव्हिड मलानच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी केली व संघाचा डाव सावरला. मलान स्थिरावल्यानंतर बाद झाला मात्र, त्यानंतर बटलरने बेअरस्टोच्या साथीत तिसऱ्या गड्यासाठी 77 धावांची अखंडित भागीदारी केली व संघाचा विजय साकार केला.

बटलरने आपल्या नाबाद 83 धावांच्या खेळीत 52 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 4 षटकार फटकावले. बेअरस्टोने नाबाद 40 धावा करताना 5 चौकार फटकावले. इंग्लंडने 18.2 षटकांत 2 गडी गमावून 158 धावा करत सोपा विजय प्राप्त केला. तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीने समोरचे एकेक बुरुज ढासळत असताना जबरदस्त खेळी केला. त्याच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 157 धावा करण्याचे आव्हान ठेवले.

दोन्ही संघात झाले बदल

या सामन्यासाठी दोन्ही संघांनी बदल केला आहे. भारतीय संघात सूर्यकुमार यादवच्या जागी रोहित शर्माला तर, इंग्लंड संघात टॉम कुरेनच्या जागी मार्क वूडला स्थान देण्यात आले आहे.

इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला, सातत्याने अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला पुन्हाएकदा या सामन्यात संधी मिळाली; पण त्याला आपयश आले. तसेच हिटमॅन रोहित शर्माने सुरुवातीला चुणूक दाखवली मात्र, त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात तो कमी पडला.

गेल्याच सामन्यात पदार्पण केलेल्या सलामीवीर इशान किशननेही बेजबाबदार फटका मारत आपली विकेट बहाल केली. यावेळी भारताची अवस्था 3 बाद 24 अशी बिकट बनली होती. त्यानंतर कर्णधार कोहली व भरात असलेल्या ऋषभ पंत यांची जोडी जमली. पंतने काही धाडसी फटकेबाजी केली मात्र, कोहलीच्या चुकीच्या कॉलवर तो चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला व ही जोडी फुटली.

यानंतर मात्र, कोहलीने एक बाजू लावून धरली आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. तसेच त्यानंतरही त्याने चौकार व षटकारांची बरसात केली. त्याला हार्दिक पंड्याने थोडीफार साथ दिली व त्यामुळेच संघाला दीडशतकी धावांपेक्षा जास्त मजल मारता आली. 20 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पंड्या बाद झाला व भारताचा डाव 6 बाद 156 धावांवर रोखला गेला.

इशान बाद झाल्यानंतर कोहलीने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेत तडाखेबंद फलंदाजी केली. कोहली 77 धावांवर नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 46 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. भारतीय संघात रोहित शर्माला सूर्यकुमार यादवच्या जागी स्थान देण्यात आले. बदली स्थान देण्यात आले आहे. तर, इंग्लंडने टॉम कुरेनऐवजी मार्क वूडला खेळवले. या सामन्यापूर्वी रोहित संघात परतणार हे खरे ठरले.

You May Also Like