खेडमधील लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 3 कामगारांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड  येथील लोटे एमआयडीसीमध्ये  एका केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अन्य 3 कामगार जखमी आहे. जखमी कामगारांना रुग्णालयात हलवलण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये  ही घटना घडली आहे. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घरडा कंपनीत अचानक स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता जास्त होती. स्फोटात 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तर 3 जण जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच घरडा कंपनीमध्ये पोलीस, अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. लोटे एमआयडीसीमधील या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.सोमवारी लोटे एमआयडीसीमधील सुप्रिया लाइफ सायन्स प्रा. लि. या कंपनीला आग लागली होती. या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाले होते. शेकडो कामगार असताना कंपनीत आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मोठी जिवीतहानी झाली नाही. ही घटना ताजी असताना आज घरडा कंपनीत स्फोट झाला आहे.

You May Also Like