गिरिप्रेमीची माऊंट अन्नपूर्णा मोहीम एप्रिलमध्ये

पुणे – गिरिप्रेमी संस्थेची आठवी अष्टहजारी मोहीम येत्या एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. गिरिप्रेमीचा चार जणांचा संघ जगातील दहावे उंच शिखर असलेल्या माऊंट अन्नपूर्णा ख (8091 मीटर उंच) शिखर मोहिमेसाठी रविवारी रवाना झाला.

गिरिप्रेमीच्या संघामध्ये भूषण हर्षे (माऊंट एव्हरेस्ट व माऊंट कांचनजुंगा या अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई), डॉ. सुमित मांदळे (माऊंट च्योओयू व माऊंट कांचनजुंगा या अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई) व जितेंद्र गवारे (माऊंट कांचनजुंगा या अष्टहजारी शिखरावर यशस्वी चढाई) यांचा समावेश आहे. या तीन सदस्यीय चढाई संघाचे नेतृत्व उमेश झिरपे (श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते गिर्यारोहक) हे करणार असून ही त्यांची सलग आठवी अष्टहजारी शिखर मोहीम आहे.

माऊंट अन्नपूर्णा

माऊंट अन्नपूर्णा हे शिखर नेपाळ हिमालयाच्या अन्नपूर्णा हिमाल पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. या पर्वतरांगेमध्ये अनेक अतिउंच शिखरे असून अन्नपूर्णा पर्वत शिखर समूह विशेष प्रसिद्ध आहे. या पर्वतरांगेत 16 शिखरे ही 6 हजार मीटरपेक्षा उंच आहेत, 13 शिखरे ही 7 हजार मीटरपेक्षा उंच आहेत तर अन्नपूर्णा ख हे एकमेव अष्टहजारी शिखर आहे.

एकूण 55 किलोमीटर लांबीचा अन्नपूर्णा शिखर समूह हा गंडकी व मार्श्‍यंगदी नद्यांच्या हिमनद्यांनी वेढलेला आहे. अन्नपूर्णा पर्वत समुहामध्ये शिखर चढाई करणे, हे अत्यंत अवघड मानले जाते. सततचे होणारे हिमप्रपात, अतिशय तीव्र धारांचा चढाई मार्ग यांमुळे अन्नपूर्णा ख या शिखरावर चढाई करणे, हे अत्यंत धोक्‍याचे आहे.

You May Also Like