जळगाव महापालिका महापौरपदी जयश्री महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी सौ. जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची आज निवड करण्यात आली. यामुळे आता जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

आज सकाळी अकरा वाजेपासून महापौर आणि उपमहापौर पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली. यानिमित्त आयोजीत बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत होते. तर व्यासपीठावर आयुक्त सतीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. दरम्यान, मतदान होण्याआधी सभागृहात मोठा गदारोळ झाला. भाजपने पहिल्यांदा शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेत त्यांना रद्द करण्याची मागणी केली. मात्र ही मागणी पीठासीठ अधिकारी जिल्हाधिकारी राऊत यांनी फेटाळून लावली. यावर भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. नंतर मात्र निवड प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. ऑनलाईन मतदान सुरू झाल्यानंतर भाजपच्या सदस्या भारतीताई सोनवणे आणि अ‍ॅड. शुचीता हाडा यांनी आवाज बरोबर येत नसल्याची तक्रार केली. तर, माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणार्‍यांवर कारवाईची मागणी केली. यामुळे सभागृहात पुन्हा थोडा गोंधळ उडाला. यानंतर सर्व नगरसेवकांचे मतदान घेण्यात आले याप्रसंगी प्रत्येक उमेदवारांची खातरजमा करून त्यांनी या दोन्ही पदांसाठी नेमके कुणाला मत दिले याची माहिती जाणून घेतली. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर महापौरपदी सौ. जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदावर कुलभूषण पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. शिवसेनेने ही लढत ४५ विरूध्द ३० अशा फरकाने जिंकली.

You May Also Like