जळगाव : संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी ; खा. रक्षाताई खडसेंची शरद पवारांकडे मागणी

जळगाव : कोरोनात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा करून मदत जाहीर करावी, अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

गेले वर्षभर कोविड या महामारीमुळे सतत सुरू असलेल्या लॉकडाऊन व जिल्हाबंदीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव नाही, केंद्र सरकारचे पॅकेज वगळता राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत नाही, जिल्हाबंदीमुळे वाहतूक बंद आहे, बाजार समित्या बंद असून हाताशी पैसा नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती उत्पादनाचे प्रचंड नुकसान होत असून उभी पिके नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. शेतात ओतलेला पैसा मातीत गेला असून शेतकरी कधी नव्हे एवढा निराशेच्या गर्तेत सापडला आहे. बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद झाल्याने नाशवंत शेतमालाची विल्हेवाट लावणेदेखील शेतकऱ्यास परवडेनासे झाले आहे. तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी सरकारकडून काही काळाची सवलत मिळावी यासाठी शरद पवार यांनी स्तरावरून पाठपुरावा करावा.

तसेच बार आणि हॉटेल व्यावसायिकांप्रमाणेच शेतकरीदेखील विजेच्या संकटात सापडला असून, वीजबिल माफी योजनेचा घोळ अजून संपलेला नाही. शेतकऱ्यांच्या थकित वीजबिलात ३३ टक्के सवलत देण्याची राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा अजूनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेली नाही. दुष्काळी मदत आणि पिकविम्याच्या योजना शेतकऱ्यांपासून लांबच आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे कोणतेही नियोजन राज्य सरकारने याकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेले नाही. लॉकडाऊनमुळे जेव्हा इतर सर्व उद्योगधंदे बंद होते, तेव्हा शेतकरी मात्र शेतात राबून पिके घेत होता. टाळेबंदीच्या काळातही शेती व शेतीपूरक उद्योगच ग्रामीण कुटुंबांसाठी आधार असल्याने राज्य सरकारने अन्य उद्योगंधंद्यांप्रमाणे शेतकऱ्यांसाठीही पॅकेज जाहीर करावे, राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार प्रमाणे तातडीने सहा हजार रुपये जमा करावेत व तातडीने शेतकऱ्यांस मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यास मदत करण्यासाठीही शरद पवार यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा व्हावा.

दूध, द्राक्षे, कांदा, भाजीपाला, केळी, आंबे, फळे, फुले आदी शेतमालाच्या बाजारपेठा टाळेबंदीमुळे बंद झाल्याने दररोजच्या उत्पन्नास शेतकरी मुकला आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेली सरसकट कर्जमुक्तीची घोषणाही सध्या वाऱ्यावर आहे.

तरी ज्याप्रमाणे शरद पवार यांनी महाराष्ट्रातील बार आणि हॉटेल मालकांची तत्काळ दखल घेतली, त्याचप्रमाणे सामान्य शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, वाजंत्रीवाले आणि हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्याच्या कुटुंबांचा आक्रोशही महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते यानात्याने त्यांनी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यापर्यंत पोहचवून या कठीण काळात थोडाफार का होईना परंतु दिलासा द्यावा, अशी विनंती पत्रामध्ये खासदार रक्षाताई खडसे यांनी केली आहे.

You May Also Like