टोलमुक्ती लांब राहिली, 1 एप्रिलपासून दर वाढणार; हायवेवरील प्रवास महागणार

देशात अनेक ठिकाणी मुदत संपली तरीही टोल वसुली  जोरात सुरु आहे. खोट्या पावत्या देऊन वाहनचालकांसह सरकारलाही फसविण्याचे उद्योग सुरु आहेत. एकीकडे वाहनांच्या किंमती, इंधनाच्या किंमती वाढत  असताना आता राष्ट्रीय हायवेवरून प्रवासदेखील महागणार आहे. 1 एप्रिलपासून टोलच्या दरांत 5 टक्के वाढ केली जाणार आहे. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  ने टोलच्या दरात 5 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मासिक पासच्या दरातही वाढ केली जाणार आहे. NHAI दरवर्षी टोलच्या दरात वाढ करते. याचा थेट परिणाम मालवाहतुकीबरोबरच खासगी वाहनचालकांसह भाड्याने वाहने घेणाऱ्यांनाही जाणवणार आहे. भाड्याने कार केली तरी त्या मार्गावरील टोल हा ग्राहकाने भरायचा असतो. यामुळे त्याचा थेट फटका वाहने नसलेल्यांनाही बसणार आहे.

काही आठवड्यांपूर्वीच खेड शिवापूर टोलनाक्यावर बोगस पावती प्रकरण उघडकीस आले होते. फास्टॅग वाहनांना बंधनकारक केल्यानंतर ज्यांच्या वाहनांवर फास्टॅग नाही त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जात आहे. या बोगस पावत्यांमुळे वाहनधारकांची लूट आणि भ्रष्टाचाऱ्यांना आंदनच मिळाले होते. आता फास्टॅगसाठीचा साधारण टोल वाढल्यावर दुप्पट टोलमध्येही वाढ होणार आहे. FASTag मुळे वाहनांच्या रांगा बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, टोल नाक्यांवर प्रत्यक्षातील स्कॅनिंगच्या समस्यांमुळे हे कागदावरच असल्याचे दिसत आहे.

टोलनाक्यांवर फास्टॅगचावापर सुरु झाला तर त्यामुळे देशाचा इंधनावरील 20000 कोटी रुपयांचा खर्च वाचणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. 16 फेब्रुवारीपासून टोलनाक्यांवर फास्टॅग वापरणे सुरु झाले आहे. NHAI नुसार फास्टॅगमुळे देशभरात दिवसाला 104 कोटी एवढा विक्रमी टोल गोळा होत आहे. 2008 मध्ये प्रत्येक टोल नाक्यावर टोल वाढविण्याची तरतूद करण्यात आली होती.

फास्टॅग घेताना त्याला आपण आपल्या वॉलेट किंवा बँक अकाउंटला लिंक करतो. ज्यामुळे टोल भरताना लागणारे पैसे आपोआप तुमच्या अकाउंटमधून कापले जातात. अशामध्ये जर तुम्ही तुमची कार विकत असाल किंवा नवीन कार विकत घेत असाल त्यावेळी जुना फास्टॅग तुम्ही डिअ‍ॅक्टीव्ह केला पाहिजे. नाही तर त्या गाडीचा वापर कुणीही केला तर त्याचे पैसे तुमच्या अकाउंटमधूनच कट होत राहतील. नोएडाचा रहिवासी अंकितने देखील अशीच चूक केली असून त्याला ती महागात पडली आहे. त्याने आपली कार विकली आणि कारवर लावलेला फास्टॅग काढून टाकायला तो विसरला.

You May Also Like