डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका; कर्नाटकच्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार – संजय राऊत

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बेळगावात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावे लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. 

बेळगावात मराठी नागरिकांवर, शिवसेनेच्या कार्यालवर हल्ले होत आहे. त्यामुळे तेथील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे. या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असे म्हणत पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावे लागेल. मी काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवेदने पाहिली आहेत. बेळगावला महाराष्ट्रात आणायचे ही त्यांची भूमिका आहे. पण सर्वात आधी तिकडच्या मराठी नागरिकांना संरक्षणाची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मी बेळगावला जाऊ शकतो; आमच्याकडे बंदुका नाहीत का?
बेळगावात सुरु असलेली दडपशाही एका राजकीय पक्षाचा किंवा सरकारचा विषय नाही, असे सांगत बेळगावातील हल्ल्यांवरून केंद्र सरकारवर संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. राज्यातून एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तात्काळ बेळगावला पाठवायला हवे, असे नाही केले तर सांगली कोल्हापूरमधील असंख्य नागरिक बेळगावात शिरतील. मी स्वत बेळगावला जायचा प्रयत्न करत आहे. मी बेळगावात जाऊ शकतो. तिथल्या असंख्य लोकांचे मला फोन येत आहेत. बेळगाव हा या देशाचा भाग आहे. आम्ही मराठी माणसे तिकडे जायचे म्हटले की आम्हाला बंदुका दाखवतात. आमच्याकडे बंदुका नाहीत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

You May Also Like