“तुम्हारी सुलू’च्या निर्मात्यांबरोबर विद्याचा आणखी एक सिनेमा

विद्या बालनकडे सध्या खूप चांगले सिनेमे आहेत. ती सध्या ‘शेमी’मध्ये बिझी आहे. मात्र, ‘तुम्हारी सुलू’च्या निर्मात्यांबरोबर ती लवकरच आणखी एक वास्तववादी सिनेमा करणार आहे. तनुज गर्ग आणि अतुल कसबेकर यांच्या एलिप्सिस एन्टरटेन्मेंटच्या आगामी सिनेमासाठी विद्याने होकार दिला असल्याचे समजले आहे.

या दोघांनीही विद्याबरोबर या सिनेमाच्या कथेविषयी चर्चा केली आहे. या नवीन सिनेमामध्ये विद्याची व्यक्‍तीरेखा अगदी कठोर असणार आहे आणि तिच्या रोलला थोडी इमोशनल शेडदेखील असणार आहे.

स्वाती अय्यर चावला या सिनेमाच्या सहनिर्मात्या असणार आहेत आणि मुंबईत आणि दक्षिण भारतत 45 दिवसांत याचे शूटिंग होणार आहे. एलिप्सिस एन्टरटेन्मेंटचा पहिला सिनेमा असलेल्या ‘तुम्हारी सुलू’मध्ये विद्या एक सर्वसामान्य गृहिणी होती. तिला रेडिओवर रात्रीच्या कार्यक्रमाचे निवेदन करावे लागले होते.

या रोलमध्ये विद्याने अगदी धमाल उडवून दिली होती. आता तिच्या नवीन सिनेमात ती काय धमाल करणार ते बघूयात. याच प्रॉडक्‍शन हाऊसच्या ‘लूप लपेटा’ या आणखी एका सिनेमात तापसी पन्नू आणि ताहिर भसीन दिसणार आहेत. ‘लूप लपेटा’चे शूटिंग नुकतेच संपले आहे.

You May Also Like