तो पीपीई किट नव्हे, पांढरा कुर्ता; अँटिलिया बाहेरील ‘ती’ व्यक्ती सचिन वाझेच?

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून  सुरू आहे. अंबानी यांच्या घराबाहेर पीपीई किट घालून आढळून आलेली व्यक्ती नेमकी कोण याचा शोध एनआयएकडून घेतला जात आहे. ही व्यक्ती निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच आहेत का, याचा तपास एनआयए करत आहे. आता या प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर आली आहे.

अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेली व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा संशय एनआयएच्या अधिकाऱ्यांना आहे. पण त्या व्यक्तीनं पीपीई किट नव्हे, तर पांढरा कुर्ता परिधान केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. सीसीटीव्ही फुटेजची बारकाईनं तपासणी करण्यात आल्यानंतर ही नवी माहिती समोर आली आहे.

सीसीटीव्हीत काही कळू नये, स्वत:ची ओळख पटू नये म्हणून सचिन वाझेंनी पांढरा कुर्ता परिधान केला असावा. पीपीई किट घातल्यास कोणालाही सहज संशय येईल. म्हणूनच त्यांनी पांढरा कुर्ता घालून डोक्याला रुमाल आणि तोंडाला मास्क लावला असावा, असा संशय एनआयएला आहे. याची पडताळणी करण्यासाठी एनआयएनं तपास सुरू ठेवला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पांढऱ्या कुर्त्यामधील व्यक्तीचे केवळ डोळेच दिसत होते.

एनआयएच्या अधिकाऱ्यांना वाझेंकडून उडवाउडवीची उत्तरं
सचिन वाझे टेक्नोसॅव्ही आहेत. तंत्रज्ञानाचा अतिशय कौशल्यानं वापर करणारे अधिकारी अशी त्यांची पोलीस दलात ओळख आहे. मात्र एनआयए चौकशीवेळी वाझेंकडे मोबाईल नव्हता. याबद्दल अधिकाऱ्यांनी वाझेंना विचारणा केली असता, माझा मोबाईल कामाच्या गडबडीत हरवला. तो कुठे पडला याबद्दल माहिती नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. वाझे यांचा लॅपटॉप एनआयएनं ताब्यात घेतला आहे. मात्र तो फॉरमॅट करण्यात आला आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांना वाझे उडवाउडवीची उत्तरं देत आहेत.

You May Also Like