‘त्या’ वक्तव्याशी जोडला जातोय अतुल कुलकर्णीच्या ‘या’ पोस्टचा संबंध; म्हणाला, “ज्येष्ठता आणि…”

पुणे । ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये अभिनेत्री कंगना राणावतने देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केले. त्याचबरोबर महागाई काय मोदींनी वाढविली का असा सवाल त्यांनी केला. संकटाच्या कडय़ावरून देशाला मागे खेचायचे असेल आणि हे चुकलेले गणित सुधारायचे असेल तर भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र आले पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मात्र आता त्यांच्या या भूमिकेला कला क्षेत्रातील इतर काही मान्यवरांनी विरोध केलाय. त्यांच्या या विधानांमुळे महाराष्ट्रातील कलाकार खूप व्यथित झाले आहेत अशी भूमिका घेत कलावर्तुळातील काही मान्यवरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. काही कलाकारांनी संयुक्तरित्या एक पत्र जारी करुन या वक्तव्यांचा निषेध नोंदवलेला असतानाच दुसरीकडे अभिनेता अतुल कुलळकर्णीने अवघ्या सात शब्दांमध्ये केलेलं एक ट्विट हे विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावरील प्रतिक्रिया म्हणून सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे.
—–नक्की गोखले म्हणाले काय?
रविवारी ब्राह्मण महासंघातर्फे अमृतमहोत्सवानिमित्त गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखले यांनी राजकीय मुद्दय़ांवर भाष्य केले. कंगना राणावत म्हणाली ते खरे आहे, अशा शब्दांत गोखले यांनी समर्थन केले. स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या योद्धय़ांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवले नाही, अशी टिपणीही त्यांनी केली.
—–हॉटेलमध्ये एका वेळी तुम्ही १० हजार रुपये खर्च करू शकता, पण…
महागाई काय मोदींनी वाढवली आहे का? असा सवाल करून ते म्हणाले,की जे लोक पक्षाचे काम करतात त्याबद्दल मी त्यांना काही बोलत नाही. पक्षाचे काम सगळेच करतात. मोदी जेव्हा पक्षासाठी काम करतात तेव्हा मी त्यांच्या बाजूने उभा राहत नाही, पण मोदी जेव्हा देशासाठी उभे राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात. एका बॅरेलची किती किंमत झाली आहे तुम्हाला माहिती आहे का? हॉटेलमध्ये एका वेळी तुम्ही १० हजार रुपये खर्च करू शकता, पण एक व्यक्ती देशात गेल्या ७० वर्षांपासून जी घाण साचली आहे ती साफ करत आहे, त्याला काही काळ का होईना मदत करता येत नाही?, असा प्रश्नही गोखले यांनी उपस्थित केला.
—–अतुल कुलकर्णीने काय म्हटले?
रविवारच्या या प्रकरणानंतर अभिनेता अतुल कुलकर्णीने ट्विटर तसेच फेसबुकवर एक पोस्ट केलीय. यामध्ये त्याने, “ज्येष्ठता आणि शहाणपण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत,” असे म्हटले आहे. अतुल कुलकर्णीने या ट्विटवर रिप्लाय करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिलेला नाही. असे असले तरी अनेकांनी हे रिट्विट केले आहे.

You May Also Like