नवी दिल्ली : “आम्हाला कामचोर, मूर्ख म्हणतात, टोमणे मारतात”; CMO वर गंभीर आरोप करत डॉक्टरांचा सामूहिक राजीनामा

नवी दिल्ली – देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर आतापर्यंत दोन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींवर गेली असतानाच उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच दरम्यान आता उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सामूहिक राजीनामा दिल्याची घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये या डॉक्टरांनी अपर मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

डॉक्टरांच्या असोसिएशनचे सचिव डॉ. संजीव कुमार यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. येथील अधिकारी आम्हाला कामचोर आणि मूर्ख म्हणतात असं संजीव कुमार म्हणाले आहेत. तुम्ही लोक काम करत नाही. सतत लखनऊ आणि कानपूरला पळून जाता, असे टोमणेही आम्हाला सरकारी अधिकारी मारत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. अधिकाऱ्यांकडूनच आम्हाला सहकार्य मिळत नाही. त्यांना ग्रामीण भागांमध्ये लसीकरण करण्यात अजिबात रस नाही. मात्र ते आमच्यावर टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत असतात असं देखील म्हटलं आहे. मोठ्याप्रमाणात डॉक्टरांनी राजीनामा दिल्याने कोरोना लसीकरणावर परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

You May Also Like