नियुक्ती रखडल्याने MPSC पात्र उमेदवारांचं आंदोलन, मात्र पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

पुणे : नियुक्ती रखडल्याने MPSC पात्र उमेदवार आज पुण्यात आंदोलन करणार होते. मात्र कोरोनाच्या कारणास्तव पुणे पोलिसांनी विद्यार्थी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. पुण्यात कोरोना संसर्गाचं मोठं प्रमाण असल्याने आंदोलनाला परवानगी देण्यात येणार नाही, असं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.

पुण्यातील नवी पेठ परिसरात हे आंदोलन होणार होतं. एमपीएससी पात्र विद्यार्थी आज एकत्र जमून शासनाचा आम्हाला नियुत्क्या द्या, अशी मागणी करणार होते. त्यासाठी त्यांनी आंदोलनाचं आयोजन केलं होतं. मात्र पुण्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता पुणे पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा राज्य सेवा अंतिम परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर करुन 8 महिन्यांचा कालावधी होत आला आहे. अद्यापही विद्यार्थ्यांना नियुक्तपत्र दिली नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पुण्यामध्ये आज (शनिवारी) नियुक्त्या रखडलेले 413 उमेदवार एकत्र येणार होते.

19 जून 2020 ला एमपीएससीचा निकाल लागून अजूनही उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत. एमपीएससीनं 413 जागांसाठी ती परीक्षा घेतली होती. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधिक्षक , प्रांताधिकारी पदावर निवड होऊन अजूनही विद्यार्थ्यांना नियुक्त्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी गोंधळले असून त्यांच्यामध्ये संतापाचं वातावरण आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जून 2020 ला राज्य सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला होता. त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या 8 महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्या उमेदवारांनी पत्र लिहीलं आहे. नियुक्त्या देऊन न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
अभ्यास करून परीक्षा पास होऊनही नियुक्त्या नाहीत
मुंबई उच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं राज्य सरकाराला 9 डिसेंबर 2020 रोजी नियुक्त्या करण्यापासून कोणीही रोखलेले नाही, असा आदेश दिल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. सर्वसमावेशक विचार करुन तात्काळ नियुक्त्या द्याव्या, अशी विनंती उमेदवारांनी केली आहे.

You May Also Like

error: Content is protected !!