पुणे : अरूंद रस्त्यांवर “बेसिक एफएसआय’ 2 असावा

पुणे – संपूर्ण राज्यासाठी शासनाने निश्‍चित केलेल्या एकात्मिक बांधकाम विकास नियमावलीत 6 ते 9 मीटर रस्त्यांसाठी बेसिक एफएसआय 2 असावा. तसेच प्रीमिएम एफएसआय घरमालक अथवा विकसकाला देण्यात यावा, अशी मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी नगरविकास विभागाचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

या नियमावलीमुळे शहरातील जुन्या वाड्याचा पुनर्विकास अडचणीत आला आहे. ही बाब लक्षात घेऊन या नियमवलीतील तरतुदीबाबत आमदार टिळक यांनी गगराणी यांच्या समवेत व्हीसीद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. वास्तुविशारद शैलेश साळे हित्तल, शैलेश टिळक उपस्थित होते.

‘या नियमवलीतील तरतुदींमुळे जुन्या पेठांमधील दीड लाख लोकसंख्या बाधित होत आहे. ही बाब लक्षात घेऊन 6 ते 9 मीटर रस्त्यावर बेसिक एफएसआय 2 असावा. प्रीमियम एफएसआय घरमालक अथवा विकसकाला देण्यात यावा, पेठांमधील वाडे लहान असल्याने इमारतीची उंची 15 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यासाठी चारही बाजूंना 1 मीटर सामासिक अंतर ठेवण्याच्या सूचनेचा फेरविचार करावा, सेसबाबत गावठाणमधील जुन्या वाड्यांमध्ये भाडेकरूंना देण्यात येणाऱ्या जागेवरच आकारण्यात यावा.

यामुळे गावठाणातील भागाचा विकास होईल. केलेल्या सर्व्हेनुसार 1.5 लाख लोकसंख्या या युनिफाइड डीसी रूलमुळे बाधित होत असल्याने याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीनं बदल करावेत,’ अशी मागणी आमदार टिळक यांनी केली आहे. गगराणी यांनीही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन यावेळी दिल्याचे आमदार टिळक यांनी सांगितले.

You May Also Like

error: Content is protected !!