पुणे May 10,2021 खेड पोलिसांचा 9692 जणांना दणका

राजगुरूनगर -खेड पोलीस ठाण्यांतर्गत आतापर्यंत 9692 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे 27 लाख 54 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.

खेड तालुका करोनाचे हॉटस्पॉट बनला असून तालुक्‍यात आतापर्यंत 22 हजारांवर करोनाबाधित झाले आहेत. प्रशासनाकडून करोना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केली जात असतानाही नागरिक मात्र शासनाचे नियम मोडत आहेत, त्यामुळे संसर्ग वाढत आहे.

नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मास्क न लावणे, गर्दी करणे, दुकानात सोशल डिस्टन्स न ठेवणे, विनाकारण गावभर फिरणे, लग्न समारंभात गर्दी जमवणे यावर निर्बंध घालण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेत दंडात्मक कारवाई केली आहे.

खेड पोलीस ठाण्यांतर्गत कलम 188 अंतर्गत 2345 जणांवर न्यायालयात खटले भरण्यात आले आहेत. त्यापैकी 30 जणांना खेड न्यायालयाने प्रत्येकी 1 हजार रुपये दंड केला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 136 जणांकडून 1 लाख 36 हजार, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या 105 जणांकडून 1 लाख 5 हजार, 22 हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजार तर 57 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून 57 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून 10 आस्थापने सील करण्यात आल्या आहेत. आस्थापनांवरील भाग 6 प्रमाणे 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लग्न समारंभात गर्दी करणाऱ्या सात मंगलकार्यालयांवर गुन्हे करण्यात आला आहे.

लॉकडाऊन असूनही विनाकारण नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने उघडी ठेवली जातात; मात्र त्यात सोशल डिस्टन्स आणि मास्कबरोबर नियमावलीचे उल्लंघन करीत आहेत; त्यामुळे कारवाई आणखी कडक करण्यात येणार आहे.

You May Also Like