‘पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवतात हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत’

मुंबई: सध्या संपूर्ण राज्यभरात सध्या एका पोलीस अधिकाऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. मनसुख हिरेन प्रकरणी भाजपने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी केली होती. ठाकरे सरकार वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, फडणवीस यांनी विधिमंडळात याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही. त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत. ज्यांच्याविरुद्ध एवढे पुरावे आहेत, त्यांना उद्धव ठाकरे डिफेंड करत आहेत. मला समजत नाही की अशी कोणती माहिती त्यांच्याकडे आहे की त्यांना वाचवलं जात आहे? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील हेच मुद्दे गाजले तर यावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. यावरून या प्रकरणाचा संपूर्ण उहापोह करत आजच्या सामनातून शिवसेनेने विरोधी पक्ष भाजप या प्रकरणात दबाव आणत असून पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात. हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

‘मनसुख हिरेन या व्यावसायिकाच्या मृत्यूने महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले. त्या ढवळण्यातून विरोधी पक्षाने काय मिळवले, याचे उत्तर ‘गमावलेला आत्मविश्वास’ असेच द्यावे लागेल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दीड वर्षात प्रथमच विरोधी पक्षनेता म्हणून सूर सापडला. आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण ‘फोकस’ विरोधी पक्षनेत्यांवर राहिला हे सगळय़ात मोठे यश. बुधवारी दुपारी सुधीर मुनगंटीवार सभागृहात आले व म्हणाले, ”पुढच्या तीन महिन्यांत आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ.” हा फाजील आत्मविश्वास आहे, सरळ स्वप्नरंजन आहे. पुन्हा सत्तेवर येण्याची भाषा म्हणजे पुन्हा पहाटे किंवा मध्यरात्रीच्या शपथविधीची तयारी. त्यासाठी नवा घोडेबाजार होणार असेल तर भारतीय जनता पक्ष आपली उरलीसुरली प्रतिष्ठाही गमावून बसेल.

मुंबई पोलिसांच्या तपासावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात. पोलिसांचे मनोधैर्यच नष्ट करतात. हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असतो. या दबावातूनच पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात. हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, पण सगळय़ांनाच पाण्यात राहायचे आहे. माशाशी वैर का करायचे असे सगळय़ांनाच वाटू लागले तर राज्याचा प्रवाह गढूळ होईल. अशी टीका आजच्या सामना च्या रोखठोक या सदरातून करण्यात आली आहे.

You May Also Like