‘फडणवीस मोदींपेक्षा मोठे नेते, मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा उंच’; राऊतांचा टोला

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस चौकशी नको आधी फाशी द्या अशी मागणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते असावेत. त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे, असा टोला राऊतांनी लगावला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्वत: पत्र लिहिलं आहे का? की त्यांना कोणी लिहून दिलं, असा सवाल संजय राऊत यांनी केला. परमबीर सिंग यांनी जे पत्र लिहिलं त्याची चौकशी करा, असं गृहमंत्री अनिल देशमुख पहिल्या दिवसापासून सांगत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही देखील चौकशी करा असं बोलत आहोत. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या. त्यांच्या राजवटीत चौकशी आधी फाशी किती वेळा दिली याची माहिती जाहीर करावी. जेणेकरुन जी काही परंपरा आहे ती समोर येईल, असं संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते असावेत. त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांची मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा उंच आहे. म्हणून पुन्हा ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. तसंच विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी देखील निटपणे सांभाळत नाहीत. विरोधी पक्षनेत्यांना त्या पदाची प्रतिष्ठा कमी होईल, असं वर्तन करु नये, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

राज्यातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षाचा नेता असतो. याचं भान प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यानं ध्यानात ठेवायला हवं, असं संजय राऊत म्हणाले. राजीनाम्याच्या आणि सरकार बरखास्तीच्या मागण्या वारंवार करणं यामुळे विरोधी पक्षाचं हसं होतं. लोकं त्यांना मुर्खात काढतात, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला. आता या पुढे काही घडामोडी घडतील असं वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

You May Also Like