भाजप-शिवसेना यांच्यातील सध्याच्या नात्याचे वर्णन करताना शिवसेना खासदार संजय राऊत

भाजप-शिवसेना यांच्यातील सध्याच्या नात्याचे वर्णन करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांना सामंजस्याने विभक्त होत असल्याची घोषणा केलेल्या आमिर खान आणि किरण राव यांची आठवण झाली. खरे तर ही तुलना करताना राऊत यांचे तसे चुकलेच, असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटची एक व्यक्ती नंतर खाजगीत मला म्हणाली, ‘आमचा काही घटस्फोट झालेला नाही. एका समान ध्येयाशी आम्ही बांधलो गेलो होतो. मतभेद असल्यामुळे एकत्र न राहणाऱ्या विभक्त जोडप्यासारखी सध्या आमची अवस्था आहे, इतकेच!’

– शिवसेनेतल्या अनेकांना अजूनही असे वाटते की भाजपशी पुन्हा संसार मांडण्याची शक्यता संपलेली नाही. मुहूर्त लांबणीवर पडला आहे इतकेच!

त्यामुळे सेनेच्या कोणा कट्टर शत्रूला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले म्हणून मोदी-ठाकरे यांच्या नात्यावर काही परिणाम होणार नाही. अनेक राज्यांत असा विरोधाभास आहेच. ओरिसात भाजप प्रमुख विरोधी पक्ष आहे, पण नवीन पटनाईक यांच्यावर तो कधीही टीका करीत नाही. आंध्राचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावरही टीका टाळली जाते. रेड्डी यांच्यावर सीबीआय, ईडीचे आरोप आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्यावर टीकेपासून भाजपवाले दूर असतात. माजी पंतप्रधान देवेगौडा विरोधात जाणार नाहीत याची काळजी पक्ष घेतो. मात्र, तेलंगणाच्या बाबतीत भाजप मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार हल्ला चढवीत असतो. पश्चिम बंगालसाठी भाजपची फुटपट्टी हीच आहे. पंजाबात मात्र मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शेतकरी आंदोलन ज्या रीतीने हाताळले त्याबद्दल पक्ष खाजगीत त्यांची बाजू घेतो. अकालींशी भले फाटले असेल; पण भाजप त्यांच्यावर टीका करीत नाही.

– त्याच न्यायाने भाजपची राज्य शाखा ठाकरेंवर टीका करीत असते, त्याच वेळी केंद्र मात्र नरमाईची भूमिका घेते. राज्यात ‘अपघात होत नाही’ तोवर एकटे चालण्यासाठी केंद्राने फडणवीस यांना स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, त्याच वेळी मोदी यांचे उद्धव ठाकरेंशी सौहार्दही कायम आहे.

You May Also Like