भारत व इंग्लंड या क्रिकेट टीम्सदरम्यान 5 मॅचची टेस्ट सीरिज 4 ऑगस्टपासून खेळली जाणार

भारत आणि इंग्लंड या क्रिकेट टीम्सदरम्यान 5 मॅचची टेस्ट सीरिज 4 ऑगस्टपासून खेळली जाणार आहे. या महत्त्वपूर्ण सीरिजपूर्वी इंग्लंड टीमचा कॅप्टन जो रूटने एक महत्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंड भारताविरोधात खेळताना संघनिवडीमध्ये रोटेशन पॉलिसी वापरून कोणताच धोका पत्करणार नसल्यासं रूटने म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त ‘स्पोर्ट्झविकी’ने दिलं आहे. भारताविरोधात खेळताना इंग्लंड त्यांची बेस्ट टीम निवडणार आहे. या सीरिजमध्ये रोटेशन पॉलिसी वापरली जाणार नाही, असं रूटने स्पष्ट केलं आहे.

नुकतीच न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांदरम्यान टेस्ट सीरिज झाली. रूट इंग्लंड टीमचा कर्णधार होता. या सीरिजमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडला त्यांच्याच मायदेशात 0-1 असं पराभूत केलं होतं. दरम्यान, भारतासोबतची टेस्ट सीरिज खेळल्यानंतर इंग्लंड अॅशेस सीरिज खेळणार आहे. त्यामुळे भारतासोबतची सीरिज ही इंग्लंडच्या अॅशेस सीरिजच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची असणार आहे.

‘दी इंडिपेंडंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘आता आम्ही अशा पातळीवर आलोय जिथे विश्रांती आणि रोटेशन पॉलिसी महत्त्वाची नाही. या गोष्टी आता मागे राहिल्यात. कोरोना विषाणूचा (corona) प्रादुर्भाव आणि विविध क्रिकेट स्पर्धांमुळे आम्हाला टीमसह आणखी बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागत आहेत. येत्या काळात आम्हाला दोन सर्वोत्कृष्ट संघांविरोधात 10 टेस्ट मॅचेस खेळायच्या आहेत. चांगल्या खेळाचं प्रदर्शन करण्याकरिता ही आमच्यासाठी चांगली संधी आहे. टीममधला प्रत्येक खेळाडू फिट असेल आणि चांगल्या फॉर्ममध्ये संघात असेल तर आमची टीम उत्कृष्ट असेल. पुढच्या 5 टेस्ट मॅचमध्ये मी माझी सर्वांत चांगली आणि मजबूत टीम खेळवण्याचा प्रयत्न करीन,’ असं जो रूटने म्हटलं आहे.

न्यूझीलंडसोबत झालेल्या सीरिजमध्ये इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सीरिजदरम्यान, रोटेशन पॉलिसीचा अवलंब करून अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेयरेस्टो, ख्रिस व्होक्स आणि मोईन अली यांच्यासारखे दिग्गज खेळाडू या सीरिजमध्ये खेळले नव्हते. आयपीएलमधून परतल्यानंतर या खेळाडूंना जास्तीची विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर न्यूझीलंडसोबतच्या सीरिजमध्ये राबवलेल्या रोटेशन पॉलिसीचा फटका इंग्लंड संघाला बसल्याचं दिसून आलं. त्यामुळे या धोरणाचा अवलंब आता केला जाणार नसल्याचं जो रूटने सांगितलं आहे. त्या पॉलिसीचा वापर केल्यामुळे जो रूटवर टीकाही झाली होती.

रोटेशन पॉलिसी न वापरण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंड त्यांच्या कोणत्या खेळाडूंना भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी संघात सामील करून घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

You May Also Like

error: Content is protected !!