महावितरणाच्या दोन कर्मचाऱ्यांना मीटर रूममध्येच डांबून ठेवल्याचा धक्कादायक

विजेचे बिल वेळेत भरले नाही म्हणून कनेक्शन कापण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या दोन कर्मचाऱ्यांना मीटर रूममध्येच डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाचपायरी परिसरातील गोविंद एकता अपार्टमेंट वेल्फेअर सोसायटीत ही घटना घडली असून तेथे राहणाऱ्या महिलेनेच हा अनोखा ‘शॉक’ दिला. याबाबतचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला असून कोणाहीविरोधात अद्यापी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र यानिमित्ताने आपली ड्युटी बजावणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांना सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महावितरणचे कर्मचारी बिल न भरलेल्या मीटरवर कारवाई करण्यासाठी गेले असताना त्यांचा तेथील एका महिलेशी वाद झाला. या महिलेने आपले थकीत वीज बिल भरण्यासाठी घरचा सदस्य गेला असल्याचे सांगितले. तरीही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन कापण्यास सुरूवात केली. त्यामुळे या महिलेचा संताप अनावर झाला व तिने चक्क मीटर रूममध्ये असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना आत डांबून ठेवून बाहेरून टाळे ठोकले.

हे कर्मचारी कुलूप काढण्यासाठी सतत विनवण्या करीत होते. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर सोसायटीच्या इतर रहिवाशांनी महिलेची समजूत घालून 20-25 मिनीटांनी डांबून ठेवलेल्या दोघांना बाहेर काढले. सदर महिला व कर्मचाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. सध्या कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. असे असतानाही अवघ्या अडीच हजारांसाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन कापले. या रागातून महिलेने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

You May Also Like

error: Content is protected !!