माजी मंत्री संजय राठोडांच्या वाहनासमोर दिव्यांग युवक आडवा झाला, राठोड म्हणाले..

यवतमाळ : माजी वनमंत्री तथा दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या वाहनासमोर एक दिव्यांग युवक झोपून अचानक आडवा झाल्याने एकच खळबळ उडाली. आपल्या भागातील रस्त्याचे प्रलंबित कामासाठी त्याने हे पाऊल उचलले आणि लागलीच वाहन थांबवून चर्चेचे आश्वासन संजय राठोड यांनी दिले.

आमदार संजय राठोड दिग्रस विश्रामगृहावर जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आले असता भेट न झाल्याने वैभव नगरमधील एका दिव्यांगाने चक्क झोपून आमदार संजय राठोड यांची गाडी शासकीय विश्रामगृहातून बाहेर निघता वेळी अडवली. ही घटना काल सायंकाळच्या दरम्यान घडली.

वैभव नगरमधील भास्कर वाघमारे हा दिव्यांग युवक राठोडांच्या भेटीसाठी आपली समस्या घेऊन आला होता. मात्र बराच कालावधी होऊन त्याला भेट मिळाली नाही. अशात आमदार राठोड हे विश्रामगृह बाहेरच्या दिशेने वाहन घेऊन निघाल्याने दिव्यांग भास्करने राठोडांच्या वाहनापुढे चक्क झोपून त्यांचा रस्ता अडविला.

यावेळी लागलीच पोलिसांनी वाघमारे यास उठवून आमदार राठोड यांचेकडे घेऊन गेले. यावेळी भास्कर वाघमारे याने एकवेळ वैभव नगर येथे भेट देऊन नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांचा राजीनामा
मूळची परळीची असलेली परंतु पुण्यात वास्तव्याला असलेली पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने त्यांना काही दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. मागील महिन्यात राज्याच्या राजकारणाचा पारा वाढवणाऱ्या या विषयाने महाविकासआघाडी सरकारची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ केली होती. विरोधी पक्षाने संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे सरकारची कोंडी केली होती. त्यामुळे आघाडी सरकारने हा निर्णय घ्यावा लागला.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांनी मातोश्रीचा विश्वास गमावला
संजय राठोड यांनी सुरुवातीपासून या प्रकरणात संशयास्पद भूमिका घेतली. त्यांच्यामुळे महाविकासआघाडीला घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या हाती मोठा मुद्दा सापडला. विशेष म्हणजे या मुद्द्यावरुन भाजपने शिवसेनेवर मोठे हल्ले चढवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशातच संजय राठोड यांनी या प्रकरणाची चौकशी होऊन निकाल येऊपर्यंत स्वतःहून पदापासून दूर होण्याऐवजी शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राठोड यांनी मातोश्रीचा विश्वासही गमावला.

You May Also Like