मालेगाव भीषण शांत, माथेफिरूंनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर, संशयितांची धरपकड

नाशिक । त्रिपुरातल्या कथित घटनेने मालेगावमध्ये माथेफिरूंनी अक्षरशः हैदोस घातल्याचे उघड झाले आहे. त्यांनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. पोलीस उपअधीक्षकांच्या सुरक्षारक्षकावर कटरने वार केले. या भीषण घटनेत अधिकाऱ्यांसह दहा जवान जखमी झाले झालेत.
त्रिपुरा येथे घडलेल्या कथित घटनेच्या निषेधार्थ मालेगावमध्ये शुक्रवारी बंद पुकारण्यात आला. मात्र या बंदमध्ये काही माथेफिरूंनी अक्षरशः हैदोस घालून शहराला वेठीस धरले. सुमारे पाचशे जणांच्या जमावाने जुना आग्रा रोड, बसस्थानक, किदवाई रोडवर नंगानाच केला. हॉटेल, दुकाने, घरांवर दगडफेक केली. पोलिसांच्या वाहनांनाही सोडले नाही. या भीषण अराजकाच्या एकेक घटना आज समोर येत आहेत. अपर पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी, शहर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी कर्मचाऱ्यांसमवेत या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संशयितांनी प्रचंड दगडफेक केली. जवळपास अडीच तास हा भयाण हैदोस सुरू होता. त्यात काही संशयितांनी पोलीस उपअधीक्षक दोंदे यांच्या सुरक्षारक्षकावर कटरने हल्ला केला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस नाईक सूर्यवंशी यांच्यावर बेछूट दगडफेक करत प्राणघातक हल्ला केला. या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी, सात जवान जखमी झाले. पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली असून आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतल्याचे समजते. दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये विविध संघटनांसह शाही मशिदचे इमाम आणि शहर-ए-खतीब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लीम समाज व्यावसायिकांनी शांततेत बंद पाळला.
——-पालकमंत्र्यांचे शांततेचे आवाहन
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शांततेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, त्रिपुरातील घटना दुःखदायी आहे. त्याचा निषेध. मात्र या देशात काही जण जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना बळी पडू नये, मालेगावमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस तैनात आहेत. आता नागरिकांनी शांतता पाळावी. कसल्याती अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले.
मालेगाव येथील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्या ठिकाणी दंडाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व संयम बाळगावा.

You May Also Like