‘मास्टर ब्लास्टर’च्या चाहत्याने घोरावडेश्‍वर डोंगरावरून पाहिला भारत-इंग्लंड सामना

सोमाटणे – क्रिकेटचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या चाहता सुधीर कुमार चौधरी याने मंगळवारी (दि.23) घोरावडेश्‍वर डोंगरावरून भारत-इंग्लंड यांच्यात झालेला पहिला एकदिवसीय सामना पाहिला. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मैदानावरील हा सामना खेळविण्यात आला होता. क्रिकेटचा चाहता असलेले सुधीरकुमार हे भारताचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी हजेरी लावतात हे विशेष.

कसोटी आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर मंगळवारपासून पुण्यात भारत-इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकेला प्रारंभ झाला. करोना संसर्गामुळे विनाप्रेक्षक एकदिवसीय मालिका होणार आहे. भारतीय संघ आणि विशेषत: सचिन तेंडुलकरचा खास चाहता असलेला सुधीरकुमार चौधरी यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामना पाहण्यासाठी थेट घोरावडेश्‍वर डोंगरावर हजेरी लावली.

राष्ट्रध्वजाच्या तीनही रंगांनी शरीर रंगवलेले, हातात शंख आणि मोठा राष्ट्रध्वज घेऊन सुधीरकुमार चौधरी घोरावडेश्‍वर डोंगरावर उपस्थित होते. यापूर्वी भारताचे क्रिकेट सामने पाहण्यासाठी त्यांनी अनेकदा देश-विदेशात हजेरी लावली. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी त्यांनी भारतातून थेट पाकिस्तानात सायकलवरून प्रवास केला आहे.

सुधीर कुमार हे मुजफ्फुराबादचे रहिवासी आहेत. क्रिकेट आणि सचिन तेंडुलकर यांच्या खेळ पाहण्यासाठी त्यांनी आतापर्यंत चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांवर पाणी सोडले आहे. दरम्यान, घोरावडेश्‍वर डोंगरावर मंगळवारी अनेक क्रीडा रसिकांनी उपस्थिती लावली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

You May Also Like

error: Content is protected !!