मुंबईकरांचे प्रकल्प पूर्ण करण्यात शिवसेना अकार्यक्षम-भाई जगताप

मुंबई : शिवसेनेच्या अकार्यक्षमतेमुळे मलनि:स्सारण प्रक्रिया प्रकल्प पंधरा वर्षांपासून रखडले. शिवसेना, प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले. यातील दंडापोटी लाखो रूपये वाया जात असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी शुक्रवारी केला.

आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जगताप यांनी मुंबईच्या प्रश्नांवर शिवसेनेवर हल्लाबोल केला. २००३पासून मलनिःसारण प्रकल्पाची चर्चा सुरु आहे. २०१७चे आश्वासनही मागे पडले. मुंबईतील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच समुद्रात सोडले जाते. याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई महापालिकेला तब्बल २९.५ कोटींचा दंड ठोठावला. त्यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि स्थगिती मिळवल्याचे सांगत प्रशासन पाठ थोपटून घेत आहे. परंतु, न्यायालयाने स्थगिती दिली म्हणून मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न जगताप यांनी केला. लवादाच्या दंडाला स्थगिती मिळवली असली, तरी न्यायालयाने दर महिन्याला दहा लाखांचा दंड ठोठावला. तो तरच भरावाच लागत आहे.
पंधरा वर्षांपासून कोणामुळे प्रकल्प रखडले, प्रकल्प रखडवणारे झारीतील शुक्राचार्य कोण, असे प्रश्नही जगताप यांनी उपस्थित केले.

पूर्व उपनगरातही हवे ट्राॅमा केअर
पूर्व उपनगरातील विविध अपघातांच्या घटनांमुळे येथे अत्याधुनिक ट्राॅमा केअर सेंटर उभारण्याची मागणी जगताप यांनी केली. दहा वर्षांच्या आरक्षणाला पाठिंबापूर्वीप्रमाणे दहा वर्षांचे आरक्षण करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला काँग्रेसचे समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले.

‘स्थानिकांचे पुनर्वसन करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या’
देवनार डम्पिंग ग्राऊंडची मर्यादा संपली आहे. कांजूरमार्ग येथील क्षमता कमी आहे. त्यामुळे मुंबईतील घनकचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. स्थानिकांचे पुर्नवसन करावे, अशी मागणी जगताप यांनी केली.

You May Also Like