मुंबईकरांनी ठरवले तर कोरोनाला थोपवता येईल; विनामास्क फिरणाऱयांना महापौरांचे आवाहन

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, त्याला 5 टक्के मुंबईकरांची बेफिकिरी आणि बेजाबदारपणा कारणीभूत आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे, लोकल, प्रार्थना स्थळे या ठिकाणी विनामास्क फिरू नये. मुंबईकरांनी राज्य आणि पालिकेच्या सर्व नियमांचे पालन केले आणि ठरवले तर कोरोनाला थोपवणे शक्य आहे, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना केले.

मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी मास्क ही शिक्षा नाही तर सुरक्षा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मास्क वापरा आणि गर्दी करू नका, असे आवाहन करत पालिकेकडून घेण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लोकांची सुरक्षा ही पालिकेची जबाबदारी आहे. मात्र, लोकांनीही आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. सुरक्षित राहून काम केले पाहिजे. कोरोनाचे संकट पुन्हा मोठे होऊ पाहत आहे. मात्र, मुंबईकरांनी सहकार्य केले तर या संकटाला मोठे होण्यापासून रोखता येईल. त्यासाठी मुंबईकरांची साथ हवी, असे आवाहन महापौरांनी केले. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर शनिवार आणि रविवारी दहिसर परिसराचा दौरा करणार असून मॉलमध्ये येणाऱया ग्राहकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करणार आहेत.

You May Also Like