मुंबई : आईच्या निधनानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचा मोठा निर्णय, तुम्हीही कराल सलाम !

मुंबई : सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरस विरुद्धची लढाई लढत आहे. या महामारीमुळे अनेकांनी आपली जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. भारतीय क्रिकेटपटू देखील याला अपवाद नाहीत. काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. काही माजी खेळाडूंचं यामध्ये निधन झालं. तर काही जणांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनामुळे गमावले आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमची सदस्य वेदा कृष्णमूर्तीनं आई आणि मोठ्या बहिणीला कोरोनामुळे गमावले आहे. त्यानंतर काही दिवसांनीच महिला टीमची अन्य एक क्रिकेटपटू प्रिया पूनियाच्या आईचं सोमवारी कोरोनामुळे निधन झाले.

इंग्लंड दौऱ्याच्या तयारीत असलेल्या प्रियाला आईच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे. तिने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचवेळी तिनं कर्तव्याला पहिलं प्राधान्य देत इंग्लंड दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याचं प्रियानं सांगितलं आहे. प्रिया आता बायो-बबलमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत जाणार आहे. मुंबईतील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतीय पुरुष आणि महिला टीम एकत्र इंग्लंडला रवाना होणार आहेत.

You May Also Like

error: Content is protected !!