मुंबई पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट, शरद पवार हसले आणि म्हणाले…

मुंबईची माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार यांनी संपूर्ण प्रकरणाची चांगल्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी, असा सल्ला राज्य सरकारला दिला असल्याचं म्हटलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार, नाइट क्लब आणि रेस्टॉरंट्सकडून महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. तुम्हीही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. खरंच असं काही टार्गेट मुंबई पोलिसांना असतं का? असा प्रश्न एका पत्रकारानं शरद पवार यांना विचारला. त्यानतंर पवार हसले आणि म्हणाले “हे तुम्ही मला काय मुंबई पोलिसांच्या कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला किंवा माजी अधिकाऱ्याला विचारलं तर तेही हसतील, असं पवार म्हणाले.

१०० कोटी नाही, मग किती मिळतात? असं विचारलं असता पवारांनी त्यावरही हसत माध्यमांच्या प्रतिनिधीलाच प्रतिप्रश्न केला. “माझ्या माहितीत तरी असं काही नसतं. तुमच्याकडे काही याची माहिती असेल किंवा तुमचं काही असोसिएशन असेल अशी माहिती देणारं तर मलाही याची माहिती द्या”, असं म्हणत पवार यांनी खिल्ली उडवली.

“परमबीर यांनी पत्रात केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. पण त्यांनी १०० कोटींचं टार्गेट दिल्याचं म्हटलं पण पैसे जातात कुठे? ते काही सांगितलेलं नाही”, असंही पवार यावेळी म्हणाले.

You May Also Like