मुंबई : पोलीस महासंचालक कार्यालयात कोविड सेल; राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणार

मुंबई : राज्यातील पोलिसांसाठी मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात कोविड सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाबाधित पोलीस अधिकारी व कर्मचारी किती, त्यांना व्यवस्थित उपचार मिळतात की नाही, लसीकरणाची स्थिती कशी आहे आदी बाबींवर लक्ष ठेवण्यात येणार असून परिस्थितीनुसार कोणाला मदत लागली तर ती पुरविण्याचे काम या सेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यात ‘कोरोना योद्धा’ म्हणून नागरिकांची सुरक्षा करणारे पोलीसदेखील बाधित होत आहेत. याची दखल घेत राज्यातील प्रत्येक जिह्यात कोविड सेल स्थापन करण्यात आला असून तेथे एका नोडल अधिकाऱयाची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना झालेल्या अधिकारी, कर्मचाऱयाला उपचार मिळतात का, स्थानिक पातळीवर पोलीस दलात कोरोनाची परिस्थिती कशी आहे, कोरोनामुळे किती पोलीस शहीद होतात, ऑक्टिव्ह केसेस किती आहेत यावर संबंधित नोडल अधिकारी देखरेख ठेवत असतो. पण याची व्यापकता आता आणखी वाढविण्यात आली आहे. राज्य पोलीस मुख्यालयात ‘कोविड सेल’ स्थापन करून आता या सेलच्या माध्यमातून प्रत्येक जिह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच संबंधित पोलिसांना आवश्यक मदत मिळते की नाही याची माहिती घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याचे काम केले जाणार आहे.

याआधी काही दिवसांपूर्वी महासंचालक कार्यालयात पोलीस व मंत्रालयीन कर्मचाऱयांसाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे कोविड सेल 24 तास कार्यरत राहणार आहे. प्रशासन विभागाचे पोलीस अधीक्षक या सेलचे प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. तर प्रशासन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक या सेलवर देखरेख ठेवतील. राज्य नियंत्रण कक्षात असलेल्या या सेलमध्ये तीन कर्मचारी कार्यरत राहतील, तर 022-22822631 असा या सेलचा हेल्पलाइन नंबर असणार आहे.
कोरोनाबाधित पोलिसांसाठी जिल्हा पातळीवर बेड्स, रेमडेसिवीर, टॉक्सिलीझुमॅब, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, विलगीकरण आदी किती प्रमाणात उपलब्ध आहेत याबाबतची माहिती ठेवून इतर घटकाला साधनसामुग्रीची आवश्यकता पडली तर कोणत्या घटकांकडून उपलब्ध करून देता येईल ते बघणे आणि औषधे देण्याचे काम सेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
जर कोविड-19 संबंधी कोणत्याही कर्मचाऱयाचे स्थानिक पातळीवर समाधान न झाल्यास त्यांनी हेल्पलाइनशी संपर्क साधून तक्रार द्यायची आहे. अशा पोलिसाला मदत करण्याचे काम या सेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

You May Also Like