मोठी कारवाई; 5 लाखांची लाच घेताना पालिका अधिकाऱ्याचा भांडाफोड

मुंबई, 18 मार्च : राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या दुय्यम अभियंत्यास 5 लाखांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडलं आहे. याशिवाय एका कंत्राटदारालाही अटक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे तब्बल 27 लाखांची लाच मागितली होती, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 5 लाखांची रक्कम देताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा भांडाफोड केला.

मिळालेल्या माहितीनुसार ससुन डॉक येथील मासेमारीचा व्यवसाय असलेल्या व्यक्तीने यासंदर्भात तक्रार केली होती. तक्रारदाराने ससुन डॉक येथे बीपीटीच्या मालकीच्या पडीक जागेवर बोटींचं सामान आणि खलाशांना राहण्यासाठी गोडावून बांधण्यासाठी फोर्ट येथील कार्यालयात अर्ज दिला होता.

या बांधकामाकरिता बबलु नावाच्या कंत्राटदाराला काम दिलं होतं. या बबलु नावाच्या व्यक्तीने अधिकाऱ्यांसोबत आपली ओळख असल्याचं सांगून 8 मार्च रोजी अधिकाऱ्याची भेट घडवून आणली.  यावेळी अधिकाऱ्याने परवानगी देण्यासाठी 27 लाखांची लाच मागितली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात 5 लाख रुपये बबलु या व्यक्तीला देण्यास सांगितलं. त्यानुसार 18 मार्च रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचला व फोर्ट येथील दुय्यम अभियंता संदीप कारभारी गिते (वय 41) यांना रंगेहाथ पकडलं.

You May Also Like