राज्यपालांना 12 आमदारांवर पीएचडी करायचीय का, राऊतांचा खोचक सवाल

नवी दिल्ली – शिवसेना नेते खासदार संजय राऊत सातत्याने 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यपालांना विचारत आहेत. राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका होणारच, असे सांगत जोपर्यंत राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत राज्यपालांवर आम्ही टीका करणारच, असे राऊत यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर, आज पुन्हा एकदा त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

राज्यपाल आजकाळ खूपच व्यस्त आहेत, त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ आहे की नाही हेही मला माहिती नाही. मात्र, गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या लोकांचं राजभवनमध्ये येण-जाणं, खाणं-पिणं चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या कॅबिनेटने राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तीसाठीची यादी पाठवून 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. त्या 12 नावांचं काय झालंय, राजभवनमधून त्याचा खुलासा व्हायला हवा. ते अभ्यास करतायंत ते ठिकंय, पण यातून काय त्यांना पीएचडी वगैरे मिळवायची आहे का? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.

घटनात्मकदृष्ट्या आम्ही जी नावं पाठवली ती, आपल्या मांडीखाली दाबून एखादा गिनीज बुकमधील विक्रम करायचाय का राज्यपालांना हाही अभ्यासाचा विषय आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते जेव्हा राज्यपालांना भेटतात, तेव्हा तेही या 12 आमदारांबद्दल का प्रश्न विचारत नाहीत. राज्य सरकारबद्दल राज्यपालांनी आजपर्यंत जी भूमिका घेतलीय, त्यामुळे राज्यातील जनतेच्या मनात राजभवनाविषयी संभ्रम निर्माण झालाय, असेही राऊत यांनी म्हटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन भ्रष्टाचार, बदल्यांचे रॅकेट अशी सरकारविरोधातील 100 प्रकरणे सादर केली. यावरुनही संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

राज्यपाल हे संवैधानिक पद

राज्यपाल हे पद संवैधानिक आहेत. त्या पदाचा मान राखला पाहिजे, हे मला सुद्धा कळतं. पण राज्यपालांचा मान विरोधकांनीच ठेवला नाही. राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होणारच. जोपर्यंत राज्यपाल 12 सदस्यांच्या नावाला मंजुरी देत नाही. तोपर्यंत आम्ही टीका करतच राहणार. राज्यपाल भाजपाच्या दबावाखाली या फायलींवर सही करत नाहीत, असे म्हणत या फाईलमध्ये असं काय आहे? त्यामुळे राज्यपाल या फायलीवर का सही करत नाही? असा सवालही संजय राऊत यांनी केला.

You May Also Like

error: Content is protected !!