राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासात 28,699 नव्या रुग्णांची भर

मुंबई : राज्यात मंगळवारी 28,699 कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि 13,165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 22,47,495 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,30,641 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.73% झाले आहे.

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगढ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमधे दररोज नवीन रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात एकूण नोंद झालेल्या नवीन प्रकरणांपैकी 80.90% अर्थात 40,715 इतके रुग्ण या सहा राज्यातलेच आहेत.

 

फेब्रुवारीच्या मध्यामधे भारतातल्या कोरोना रुग्णसंख्येने तळ गाठला होता. मात्र त्यानंतर एकूण सक्रीय रुग्णसंख्या वाढतच आहे. देशातील एकूण सक्रीय प्रकरणांपैकी 75.15% रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या तीन राज्यातले आहेत. देशातील एकूण सक्रीय प्रकरणांपैकी एकट्या महाराष्ट्राचा वाटा 62.71% आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घरी कोरोनाचा प्रवेश
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. रश्मी ठाकरे यांनी 11 मार्चला कोवॅक्सिन लस घेतली होती. 20 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्वीट करून ही माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, तसेच कोरोना चाचणी करावी, असे आवाहन केले होते. मात्र आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.

सरकारनं वारंवार काही निर्देश देऊनही अनेक ठिकाणी नागरिकांचा बेजबाबदारपणा हा संसर्ग आणखी वेगानं पसरवण्यास कारणीभूत ठरत आहे. ज्यामुळं अनेक उपाययोजनांनंतरही रुग्णसंख्यावाढ कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लस 45 वर्षांवरील सर्वांना देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. सध्या 45 वर्षांवरील परंतु सहव्याधी असलेल्या आणि 60 वर्षांवरील सर्वांना लसीकरण केले जात होते. आज घेतलेल्या निर्णयामुळे आता सरसकट 45 वर्षांवरील नागरिकांना लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

You May Also Like