रावेर : वादळी वाऱ्यामुळे झाडाची फांदी डोक्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू

सावदा, ता. रावेर काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे डोक्यावर झाडाची फांदी पडल्याने सावदा येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, काल सायंकाळी सावद्यासह परिसरात विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. यात वादळाचा जोर इतका होता की, अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली. तर काही ठिकाणी झाडे कोसळून पडली. या अनुषंगाने शहरातील क्रांती चौकातील रहिवासी तथा अन्नपूर्णा मेसचे मालक चेतन सुभाष पाटील यांच्या डोक्यावर झाडाची फांदी पडली. यात ते जखमी झाल्यामुळे त्यांना तातडीने भुसावळ येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
या रूग्णालयात उपचार सुरू असतांनाच त्यांनी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास शेवटचा श्‍वास घेतला. चेतन पाटील हे सुभाष पाटील यांचे पुत्र असून त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी आणि एक चिमुकली कन्या असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

You May Also Like