लक्ष्मण-द्रविड दिवसभर खेळले आणि बदललं भारतीय क्रिकेट!

मुंबई, 14 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया  यांच्यातील कोलकाता टेस्टमध्ये आजच्या दिवशी 20 वर्षांपूर्वी (14 मार्च 2001) इतिहास घडला. या दिवशी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण  आणि राहुल द्रविड ही जोडी दिवसभर खेळली. त्यांनी संपूर्ण दिवस आऊट न होता 335 रनची पार्टरनरशिप केली. त्या पार्टरनरशिपमुळे भारताने कोलकाता टेस्ट तर जिंकलीच त्याशिवाय भारतीय क्रिकेटच्या नंतरच्या वाटचालीतही त्याचा परिणाम झाला आहे.

राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यामधील गुणवत्तेबद्दल कोणालाही शंका नव्हती. द्रविडनं इंग्लंडमधील पहिल्याच दौऱ्यात ठसा उमटवला होता. तर लक्ष्मणच्या कारकीर्दीमध्ये चढ-उतार होत होते. कोलकाता टेस्टच्या तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाच्या पराभवाच्या सावटाखाली असताना हे दोघे एकत्र आले. त्यानंतर त्यांनी चौथ्या दिवशी त्यांच्या क्रिकेट करियरमधील सर्वोत्तम खेळी केली.

ती पार्टरनरशिप का सर्वोत्तम?

स्टीव्ह वॉ  याच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये सर्वच्या सर्व 11 खेळाडू हे दिग्गज होते. सर्व जग जिंकून ऑस्ट्रेलियाची टीम भारतामध्ये दाखल झाली होती. त्या दौऱ्यातील मुंबई टेस्ट ऑस्ट्रेलियाने सहज जिंकली. त्यानंतर कोलकातामध्ये भारताची पहिली इनिंग ही फक्त 171 रनवर आटोपली. भारतावर ‘फॉलो ऑन’ ची नामुष्की ओढावली होती. कोलकाता टेस्टसह मालिका विजय ऑस्ट्रेलियाच्या अगदी आवाक्यात आला होता.

कोलकाता टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये लक्ष्मण तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला आला. त्याने सौरव गांगुलीसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी पार्टनरशिप केली. पण ती पार्टरनरशिप पुरेशी नव्हती. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा भारतीय टीम अजूनही 20 रननी मागे होती. लक्ष्मण आणि द्रविड ही भारतीय बॅट्समनची शेवटची जोडी मैदानात होती.

भारतीय टीम चौथ्या दिवशीच पराभूत होईल असा अनेकांचा अंदाज होता. पण लक्ष्मण आणि द्रविड यांच्या मनात काही वेगळेच होते. ग्लेन मॅग्रा, शेन वॉर्न, गिलेस्पी सारख्या दिग्गज ऑस्ट्रेलियन बॉलर्सचा समावेश असलेल्या आणि यशाची सवय भिनलेल्या ऑस्ट्रेलिन बॉलिंग अटॅक समोर ते दोघे दिवसभर निर्धारानं खेळत होते. त्यांनी संपूर्ण दिवस खेळून काढला. ऑस्ट्रेलियाच्या एकाही बॉलरला या जोडीनं चौथ्या दिवशी दाद दिली नाही. त्यांनी दिवसभरात 335 रन काढले. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताचा स्कोर 4 आऊट 589 असा भक्कम झाला होता.

लक्ष्मण-द्रविडच्या पार्टनरशिपमुळे कोलकाता टेस्ट फिरली. संपूर्ण टीममध्ये लढण्याची जिद्द जागृत झाली. भारताने आधी कोलकाता टेस्ट आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका देखील 2-1 ने जिंकली. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण मॅच फक्त वाचवू शकत नाही तर जिंकू देखील शकतो हा विश्वास भारतीय खेळाडूंमध्ये निर्माण झाला.

 

21 व्या शतकातील निर्भिड टीम इंडियाचा पाया कोलकाता टेस्टने रचला. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियात मालिका बरोबरीत राखली. पाकिस्तानात मालिका जिंकली. परदेशात अनेक संस्मरणीय विजय मिळवले. अगदी नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील भारतीय टीमने पिछाडी भरुन काढत मालिका जिंकली. प्रत्येक अडचणीच्या वेळी जिद्दीनं कमबॅक केले. त्या सर्वांचा पाया 2001 साली कोलकातामध्ये लक्ष्मण-द्रविड या जोडीने केलेल्या पार्टरनरशिपमध्ये रचला गेला होता.

You May Also Like