लसीकरण केंद्र कसे वाढवणार, मनुष्यबळ कुठून आणणार? पुणे महापालिकेपुढे पेच

पुणे – लसीकरणाचा चौथा टप्पा दि. 1 एप्रिलपासून सुरू होणार असून, वय वर्षे 45 च्या पुढे असलेल्या सगळ्यांनाच लस दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. परंतु सद्यपरिस्थितीत लसीकरण केंद्र कशी आणि कोठे वाढवणार, मनुष्यबळ कसे उभे करणार याचा मोठा पेच पालिकेसमोर उभा राहिला आहे. शहराच्या एकूण 45 लाख लोकसंख्येच्या 23 टक्के संख्या (सुमारे 10 लाख 35 हजार) ही 45 वयाच्या पुढची आहे.

महापालिकेने सद्यस्थितीत खासगी आणि महापालिकेची मिळून सुमारे 100 केंद्रे उभारली आहेत. तेथेही गर्दी वाढत आहे. हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स मिळून सुमारे 7 लाख संख्या होती. त्यानंतर शहराच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के संख्या 60 पेक्षा जास्त वय असलेल्यांची आणि दीड ते दोन लाख सहव्याधी असलेल्यांची संख्या आहे. मात्र, चौथ्या टप्प्यात लाभार्थींची संख्या लाखोंनी वाढणार आहे. त्यामुळे तेवढ्यांना लस देण्यासाठी केंद्र कोठे सुरू करणार हा प्रश्‍न महापालिकेपुढे निर्माण झाला आहे.

रुग्णालयांमध्येच लसीकरण करण्यासंबंधांत केंद्र सरकारने आदेश काढला आहे. सुरूवातीला 100 बेडपेक्षा कमी संख्या असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला केंद्राने परवानगी नाकारली होती. मात्र, महापालिकेने केंद्राला या संबंधात पत्र पाठवून विनंती केली आहे. अद्यापही 25 खासगी प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना मंजुरी मिळाल्यास आणखी केंद्र वाढतील.

…तर 500 केंद्रांची गरज
महापालिकेने स्वत:च्या रुग्णालयांमध्ये 50-52 केंद्र सुरू केले आहेत. प्रभागांमध्ये जिथे शक्‍य तिथे नियमानुसार केंद्र उभारण्यात आली आहेत. मात्र, केंद्रांच्या नियमानुसार आता महापालिकेला सुमारे 10 लाख नागरिकांना लस टोचावी लागणार आहे. त्यासाठी किमान 500 केंद्रे उभारावी लागणार आहेत. आणि ती उभरण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. येथून पुढे मोठ्या लोकसंख्या लसीकरण प्रक्रियेत येणार असल्याने त्यांच्या लसीकरणाची सोय महापालिकेला करावीच लागणार आहे.

7 दिवसांचाच वेळ
लसीकरण केंद्राच्या जागेसोबतच कॉम्प्युटर्स, ते चालवण्यासाठी मनुष्यबळ, लस टोचक आणि अन्य कर्मचारी वर्गाची सोय करावी लागणार आहे. त्यामध्ये दोन्ही प्रकारच्या लस ठेवायच्या की एकच याविषयी नियोजन करावे लागणार आहे. या सगळ्या नियोजनासाठी महापालिकेकडे केवळ सात दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे.

कोविशिल्डचे 1 लाख 18 हजार डोस आले
जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर करोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवू नये, यासाठी मंगळवारी नव्याने आणखी 1 लाख 18 हजार कोविशिल्ड लसीच्या डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे महानगरपालिकेसाठी 55 हजार, ग्रामीण व नगरपालिकेसाठी 50 हजार तर पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी 13 हजार लसीच्या डोस देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागातील सर्व लसीकरण केंद्रावर 50 हजार लसीचे वितरण करण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

तालुकानिहाय लसींचे वितरण
आंबेगाव – 4 हजार 600, बारामती – 6 हजार, भोर – 2 हजार 200, दौंड – 3 हजार 600, हवेली – 6 हजार, इंदापूर – 3 हजार 600, जुन्नर – 5 हजार, खेड – 5 हजार, मावळ – 3 हजार, मुळशी – 2 हजार, पुरंदर – 3 हजार 200, शिरूर – 2 हजार 600, वेल्हा – 1 हजार, पुणे, देहू आणि खडकी कॅन्टोन्मेंटसाठी – 2 हजार 200 याप्रमाणे लस पुरवठा झाला आहे.

You May Also Like