वाळूची टीप देण्याच्या वादातून दोन चुलत भावांचा खून

कुकुडवाड – वाळूची टीप देण्याच्या कारणावरून नरवणे, ता. माण येथे दोन सख्खे चुलत भाऊ व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघा चुलत भावांवर जीव गमावण्याची वेळ आली. चंद्रकांत जाधव यांच्या घरी घडलेल्या या घटनेत चंद्रकांत जाधव व विलास जाधव या दोघांचा मृत्यू झाला. चंद्रकांत यांचा जागीच तर विलास यांचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला.

या मारामारीत अनेक जण जखमी झाले आहेत. हाणामारीसाठी लाकूड, लोखंडी पाइप, कुर्‍हाडी व चाकूचा वापर करण्यात आला होता. याबाबत दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तहसीलदार माने यांनी नरवणे येथे जप्त केलेल्या वाळूचा लिलाव 22 फेब्रुवारी रोजी केला होता. 5 ब्रास वाळूचे चंद्रकांत जाधव यांनी 33 हजार रुपये भरून हा लिलाव घेतला होता. याबाबत सत्यवान धोंडिबा जाधव यांनी तलाठ्यांकडे तक्रार केली, की चंद्रकांत नाथाजी जाधव हे बेकायदा वाळू उपसा करत आहेत. त्यावर चंद्रकांत जाधव यांनी वाळू लिलाव घेतल्याचे सांगितले. त्यातूनच वाद वाढत गेला व त्यांच्यात व त्यांचे चुलत भाऊ विलास धोंडिबा जाधव यांच्या गटामध्ये हाणामारी झाली. हाणामारीत गंभीर जखमी झालेले चंद्रकांत नाथाजी जाधव व विलास धोंडिबा जाधव यांना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हाणामारीमध्ये जखमी झालेल्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे समजते. दोन्ही कुटुंबातील फिर्यादींचे जबाब घेण्याचे काम व गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक नीलेश देशमुख व पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करत आहेत.

You May Also Like