शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं; फडणवीसांनी सांगितला ‘त्या’ घटनेचा पुढील भाग

नागपूर: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग  यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना  दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना  लिहिलं आहे. यामुळे देशमुख यांच्यासह ठाकरे सरकारदेखील अडचणीत आलं असून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पोलीस दलातील, गृह विभागातील गैरप्रकारांवर बोलणारे परमबीर सिंग हे काही पहिले अधिकारी नाहीत. याआधी सुबोध जैस्वाल, रश्मी शुक्ला यांनीदेखील बदल्यांच्या रॅकेटबद्दल आवाज उठवला होता. पण ठाकरे सरकारनं त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. तशी दखल घेतली असती, तर आज ही वेळ आली नसती, असं फडणवीस म्हणाले.

शरद पवारांनी आज घेतलेली पत्रकार परिषद ऐकून मला आश्चर्य वाटलं, असं फडणवीस यांनी म्हटलं. ‘शरद पवार या सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे सरकारनं काहीही केलं तरीही त्यांना बचाव करावा लागतो. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना परमबीर सिंग यांनी पुन्हा सेवेत घेतलं हे खरं आहे. पण हे अर्धसत्य आहे. शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं. परमबीर सिंग यांनी निर्णय घेतल्यानंतर ठाकरे सरकारनं आक्षेप का नोंदवला नाही? त्यावेळी सरकार झोपलं होतं का?,’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

परमबीर सिंग यांनी वाझेंना पुन्हा पोलीस दलात रुजू करून घेतलं हे खरं आहे. पण अशा प्रकारे सेवेत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पद दिलं जात नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री देशमुख यांना नियम माहीत नाहीत का? सरकारच्या आशीर्वादाशिवाय वाझेंना इतकं महत्त्वाचं पद मिळू शकत नाही. सरकारचा वरदहस्त असल्यानंच वाझेंकडे अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सोपवला गेला, असा दावा त्यांनी केला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीनं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी पद सोडल्याशिवाय त्यांची निष्पक्षपणे चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा तातडीनं राजीनामा घेतला जावा. परमबीर सिंग यांनी त्यांच्याच पत्रात उल्लेख केलेलं पोलीस अधिकाऱ्यांसोबतच संभाषण हा महत्त्वाचा पुरावा आहे. हे चॅट त्यांना पदावरून दूर करण्यापूर्वीच आहे. त्यामुळे हा पुरावा अतिशय महत्त्वाचा आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

You May Also Like