सर्वात मोठी बातमी, ‘ती’ इनोव्हा कार मुंबई पोलीस आयुक्तालया जवळून घेतली ताब्यात!

मुंबई, 14 मार्च : मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए  ने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक  केली आहे. सचिन वाझेंच्या अटकेनंतर सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. जी इनोव्हा गाडी  एनआयएच्या टीमने ताब्यात घेतली आहे, ती मुंबई पोलिसांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

NIA ने ताब्यात घेतलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही शनिवारी रात्री मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या जवळून ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. ही कार गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातच उभी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारच्या मागे मुंबई पोलीस असं लिहिलं आहे. त्यामुळे या कार मागे पोलीस कनेक्शन बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणाच्या कटात 5-7 जणांचा समावेश होता. सूत्रांनुसार, NIA ने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊ शकते. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये खळबळ उडाली आहे. आता या घटनेची पाळमुळं कुठवर जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दहशतवादी संघटनेशी संबंध नाही!

एनआयएच्या तपासात आणखी एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे ठाणे याठिकाणाहून आणखी 3 जणांच्या अटकेची शक्यता आहे. याप्रकरणी इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाला अटक होऊ शकते.

मुंबईमध्ये जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अखेर एनआयएच्या पथकाने छडा लावला आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणात दहशतवादी संघटनेशी कोणताही संबंध नाही. स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेनं घेतली होती. तो टेलिग्रामवरील मेसेज निव्वळ खोडसाळपणा होता, अशी माहिती NIA च्या दिल्ली स्पेशल सेलने दिली आहे. जैश अल हिंद नावाने कोणतीही संघटना नाही. मात्र, गाडी मायकल रोडवर ठेवण्याचा उद्देश अस्पष्ट आहे.

You May Also Like