सातारा – महावितरणच्या कारवाईविरोधात उदयनराजे आक्रमक

सातारा – गतवर्षी लॉकडाऊनपासून वीज बिले थकवणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या महावितरण कंपनीच्या कारवाईविरोधात खा. उदयनराजे आक्रमक झाले आहेत. करोनामुळे गेले वर्षभर नागरिक त्रस्त आहेत. लॉकडाऊनमुळे व्यावसायिक, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे महावितरणने थेट वीजपुरवठा खंडित न करता, थकीत वीज बिले टप्प्याटप्प्याने भरण्यास मुभा द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, करोनामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिक त्रस्त आहेत. लॉकडाउन, अनलॉक यांचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होत आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यापासून गेले वर्षभर बहुतांश सर्व क्षेत्रातील व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीत, वीज बिलांच्या थकबाकीमुळे कनेक्‍शन्स तोडण्याची कारवाई महावितरण कंपनीकडून सुरू आहे. कंपनीने आजपर्यंत ग्राहकाभिमुख सेवा देऊन चांगले काम केले आहे. त्यामुळे आताची कारवाई वेदनादायी आहे. ग्राहकांना टप्याटप्याने थकबाकी भरण्याची सवलत देऊन महावितरणने जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे.

दिल्लीसारख्या राज्यात काही युनिटस्‌पर्यंत वीज बिल माफ आहे. तेथे ठरावीक युनिटपर्यंत वीज मोफत पुरवली जाते. त्या राज्यातील दरही खूप कमी आहेत. महावितरण कंपनी देशात अग्रेसर आहे. करोना काळातदेखील कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अखंड वीजपुरवठा केला. महाराष्ट्राच्या गरजेपैकी जवळपास निम्मी वीज सातारा जिल्ह्यात तयार होते, ही वस्तुस्थिती आहे. करोनामुळे कौटुंबिक गरजा भागवताना सर्वांची तारेवरची कसरत होत आहे. बहुतांश शैक्षणिक कार्य ऑनलाइन सुरू आहे. वीज नसेल तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात वीज बिलांचे वाटप करण्यात आले नाही. तीन-चार महिन्यांची वीज बिले एकत्रित देण्यात आली.

ती भरताना नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. एकत्रित वीज बिलांमुळे एकूण युनिटस्‌ वाढून जादा युनिटचा दर लावण्यात आला. यामध्ये वीज ग्राहकांचे दुहेरी नुकसान झाले आहे. या स्थितीत थकीत वीज बिले टप्याटप्याने भरण्याबाबत धोरणात्मक निर्णय कंपनीने घेतला पाहीजे. करोना काळात थकबाकीमुळे वीज कनेक्‍शन तोडणे कदापि मान्य करता येणार नाही. अशा वेळी आम्ही वीज ग्राहकांच्या बाजूने ठाम उभे राहू. कारवाईत कोणाकोणाची वीज तोडली, त्याचा आढावा घेऊन जागेवरच सोक्षमोक्ष लावताना संघर्ष अटळ ठरेल, असा इशारा उदयनराजेंनी पत्रकात दिला आहे.

You May Also Like