सातारा: शिरवळ येथे अपघातात दोन युवक ठार

शिरवळ – लोणी, ता. खंडाळा येथून सोमवारी शिरवळ बाजूकडे निघालेल्या दुचाकीला एसटी बसने हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात बसचे चाक डोक्‍यावरून गेल्याने कुणाल संजय चव्हाण (वय 18) व आदित्य देविदास चव्हाण (वय 14, रा. लोणी, ता. खंडाळा) ह युवक जागीच ठार झाले, तर ओंकार संजय भोसले (वय 18, रा. लोणी) हा युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे लोणी गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोणी येथील कुणाल चव्हाण हा चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे शिक्षण घेत होता. तो सोमवारी लोणीहून पुन्हा चिपळूणला जाणार होता. त्यासाठी त्याला शिरवळ येथे सोडायला ओंकार भोसले व त्याचा चुलतभाऊ आदित्य चव्हाण हे दुचाकी (एमएच-11-सीवाय-4836) वरून निघाले होते. सध्या शिरवळ-लोणंद रस्त्याचे काम सुरू असल्याने दोन्हीकडील वाहतूक लोणंद-शिरवळ या एकाच मार्गिकेवरून सुरू होती. कुणाल हा दुचाकी चालवत होता. ही दुचाकी शिरवळच्या हद्दीत फुलोरा सोसायटीजवळ आली असता, रस्त्याच्या एका बाजूकडून हातगाडीवाला निघाला होता.

कुणालची दुचाकी हातगाडीला ओव्हरटेक करत असताना, मागून येणाऱ्या एसटी बसच्या चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला. त्याच वेळी समोरून एक वाहन आल्याने, एसटी बस अचानक दुचाकीच्या बाजूला घेतली. त्यामुळे कुणालला हुलकावणी बसली. त्यामुळे गडबडलेल्या कुणालची दुचाकी समोर हातगाडीला धडकून रस्त्यावर पडली.

काही समजण्याआधीच नीरा-भोर या एसटी बसचे (एमएच-14-बीटी-1020) डाव्या बाजूकडील चाक रस्त्यावर पडलेल्या कुणाल व आदित्य चव्हाण यांच्या डोक्‍यावरून गेल्याने दोघेही जागीच ठार झाले, तर ओंकार भोसले हा गंभीर जखमी झाला आहे. कुणाल व चव्हाण यांच्या मृतदेहाचे विच्छेदन शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघाताची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई तपास करत आहेत.

You May Also Like