सोलापूर : भालकेंच्या जागी पोटनिवडणुकीत मुलगा की पत्नी? अजितदादा-जयंत पाटील पंढरपुरात फैसला करणार

सोलापूर : पोटनिवडणुकीच्या तोंडावर पंढरपुरात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे. त्यामुळे वाद मिटवण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या पंढरपुरात येणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांच्या मुलाला तिकीट देण्यास काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे आता भालकेंच्या पत्नीच्या उमेदवारीचीही चाचपणी होत आहे.
भगीरथ भालकेंच्या उमेदवारीला विरोध

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर 17 एप्रिल रोजी पंढरपुरात पोटनिवडणूक होत आहे. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने वाद निर्माण झाला.

राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजय देशमुख यांच्या निवडीवरुन राष्ट्रवादीत ठिणगी उडाली. युवराज पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारत त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिले. युवराज पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या बंडाची दखल थेट पक्षाने घेतली.

तेव्हाच उमेदवार घोषित करणार

अंतर्गत हात मिटविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या पंढरपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्याबाबत देखील चर्चा होणार आहे. अंतर्गत वाद मिटल्यानंतरच राष्ट्रवादीकडून उमेदवारीची घोषणा होणार आहे.

कुणाकुणाची नावं चर्चेत?

शिवसेनेचे नेत्या शैला गोडसे यांनी भाजपाशी जवळीक साधत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आता भाजपामधून उमेदवारी मिळण्याची तयारी केली आहे. तर दामाजी सहकारी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

भालके कुटुंबाबाबत सहानुभूतीची लाट

दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे मतदारसंघात भालके कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट आहे. मात्र भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यापेक्षा जयश्री भालके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, लाटेवर निवडून येण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्यासाठी जोर देत आहेत.

तर भाजपकडूनही महिला उमेदवार?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभेसाठी जयश्री भालके यांचे नाव पुढे आले तर भाजपकडूनही महिला उमेदवार देण्याची शक्यता आहे.त्यामुळे परिचारक गटाच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांचेही नाव सध्या चर्चेत आहे. नगराध्यक्षपद मिळण्याच्या आदीपासूनच त्यांनी समाजसेवेला वाहून घेतले होते. त्यांचे पती नागेश भोसले हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. शिवाय ते उद्योगपती असल्याने त्यांचं या मतदारसंघात चांगले वर्चस्व आहे.

भारत भालके यांचं निधन

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले होते. मात्र, पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.

You May Also Like