अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून 10 लाखांची मदत; मोदींची घोषणा

नवी दिल्ली : दुसर्‍या लाटेचा कहर कमी होताना पाहायला मिळत आहे. देशभरात नव्या बाधितांची संख्या कमी होताना पाहायला मिळत असली, तरी मृत्यूंचे वाढलेले प्रमाण चिंतेत भर टाकणारे ठरत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनामुळे अनेक जण अनाथ झाले आहेत. करोनाने पालकांचे छत्र हिरावून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून 10 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

ज्या मुलांचे दोन्ही पालक किंवा सांभाळकर्ते कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत, अशा सर्व मुलांना 18 वर्षांचे झाल्यानंतर मासिक वेतन देण्यात येईल. तसेच ही मुले 23 वर्षांची झाल्यानंतर पीएम केअर्स फंडातून 10 लाख रुपये दिले जातील, असे पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय या सर्व मुलांना आयुषमान योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचा विमा मोफत उपलब्ध करून दिला जाणार असून, 18 वर्षांपर्यंत याचे सर्व हफ्ते पीएम केअर्स फंडातून भरले जातील, असेही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

करोना संकटामुळे हजारो मुले अनाथ झाली आहेत. काही जणांनी एक पालक गमावला आहे, तर काही जणांनी दोन्ही पालक गमावले आहेत. आता या अनाथ मुलांचे पालनपोषण, शिक्षण यांचा मोठा प्रश्न समाजासमोर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना आणली असून, या माध्यमातून अनाथ मुलांसाठी 10 लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

You May Also Like