12वीच्या परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब!

नवी दिल्ली : करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. जर आयआयटी-जेईई सारख्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा प्रश्न याचिकाकर्त्याने उपस्थित केला होता. मात्र, ही याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा आणि सीबीएसई-आयसीएसई बोर्डाचा निर्णय योग्यच असल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश मागहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. अंशुल गुप्ता नामक व्यक्तीने ही याचिका केली होती. त्याशिवाय, उत्तर प्रदेश शिक्षक संघटनेनं विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी दोन्ही बोर्डांकडून स्वीकारण्यात आलेल्या पद्धतीला आव्हान देण्यात आलं होतं. ती याचिका देखील सर्वोच्च न्यायालयानं यावेळी फेटाळून लावली.

हस्तक्षेपाची गरज नाही!
परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं यावेळी न्यायालयानं नमूद केलं. आम्हाला वाटतंय की सीबीएसई आणि आयसीएसई या दोन्ही बोर्डांनी घेतलेल्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. सर्व विद्यार्थ्यांचं हित हा निर्णय घेताना विचारात घेण्यात आलं आहे. केंद्र सरकार आणि सीबीएसई-आयसीएसई बोर्डांकडून हा निर्णय उच्च स्तरावर विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि इतर घटकांचा विचार करून घेतला आहे. त्यामुळे आम्ही त्यावर निर्णय देणार नाही, असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं. फक्त इतर संस्था परीक्षा घेऊ शकतात म्हणून बोर्डानं देखील परीक्षा घ्यायला हवी, हा दावा मान्य करता येणार नाही. व्यापक जनहिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

You May Also Like