विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ करोना रुग्णांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये १३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास  ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षा विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्या नंतर वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त घटनास्थळी उपस्थित नव्हते. केवळ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
“विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले,” अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली आहे.

“उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत,” अशी माहिती देण्यात आली आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like