मुंबई हाय मधील 24 कर्मचारी अद्यापही बेपत्ता

कॅप्टन बल्लव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई: तौक्ते चक्रीवादळात झालेल्या पी-305 या बार्जच्या अपघातानंतर मुंबई हायजवळ हाती घेण्यात आलेली शोधमोहीम सुरूच असून आज 2 मृतदेह सापडले आहेत. याबरोबर आतापर्यंत एकूण 51 मृतदेह हाती आले आहेत. अजूनही 24 जण बेपत्ता असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. शोधमोहिमेला आतापर्यंत एकून 186 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

मुंबई हाय जवळ ओएनजीसीच्या बार्जचा (तेल उत्खननाचा निवासी तरंगता फलाट) अपघात झाला. हा अख्खा बार्ज तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात वाहून गेला. त्यामध्ये आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला असून, 24 जण अद्यापही बेपत्ता आहेत. तौक्ते चक्रीवादळाची सूचना असताना कँप्टन राकेश बल्लव यांनी बार्ज हलवण्याचा निर्णय घेतला नाही. यामुळे इतर कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात आला असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. या दुर्घटनेत बुडालेल्यांच्या मत्यूला कॅप्टन बल्लव हेच कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी ओएनजीसीवर गंभीर आरोप केले आहेत. तौक्ते चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात आला असताना देखील ओएनजीसीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. यामुळे तब्बल 700 कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला. ओएनजीसीने सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केले नाही आणि यामुळेच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप मलिक यांनी केला.

You May Also Like