हवामान बदलाचा अंदाज देणारे 4 डॉप्लर रडार पैकी 3 नादुरुस्त; चक्रीवादळाच्या संकटादरम्यान धक्कादायक माहिती समोर

हवामानतज्ञ किरणकुमार जोहरे यांचा आरोप

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव राज्यातील अनेक शहरांमध्ये दिसून येत आहे. किनारपट्टी व्यतिरिक्त इतर अनेक शहरात ताशी 18 किलोमीटर वेगानं वाहणारे वारे, सोसाट्याचा वारा आणी मध्येच येणार्‍या पावसाच्या जोरदार सरी, असं वातावरण सध्या आहे. हे वातावरण जरी अल्हाददायक असलं तरी अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हवामानातील बदलाचा अचूक अंदाज व्यक्त करणार्‍या राज्यातील 4 डॉप्लर रडारपैकी 3 रडार नादुरुस्त असल्याचा आरोप हवामानतज्ञ किरणकुमार जोहरे यांनी केला आहे.

याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाला सूचित केल्याची माहितीही त्यांनी दिली. अशा आपत्कालीन परिस्थितीत जर यंत्रणा काम करत नसेल तर हाहाकार माजू शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केल्यानं याचं गांभीर्य वाढलं आहे. अरबी समुद्रात अतितीव्र चक्रीवादळ सक्रिय असताना आयएमडीचे मुंबई रडार बंद असल्याचं समोर येत आहे. मुंबई रडार बंद पडले असल्यास ऐन चक्रीवादळाच्या धोक्यादरम्यान रत्नागिरी ते पालघर आणि नाशिक ते सातारा या पट्ट्यातील हवामानाचे अचूक अंदाज मिळणं कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त सॅटेलाईट इमेजवर अवलंबून राहावे लागणार आहे.

हे रडार बंद असल्यानं रविवारी दुपारी 1 वाजून 26 मिनिटांनंतर कोणतीही अपडेट आलेली नवहती. मात्र, संध्याकाळी सातच्या सुमारास मुंबई रडारच्या इमेजेस आयएमडीने पुन्हा खुल्या केल्या. तरीही, रडार योग्य प्रकारे काम करत नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे, सध्या राज्यात असलेल्या परिस्थितीदरम्यान समोर आलेली ही माहिती धक्कादायक आणि चिंताजनक आहे.

You May Also Like