5 हजार 247 एमबीबीएस डॉक्‍टर्स आता करोना रुग्णांच्या सेवेत

पुणे : देशासह राज्यात करोना रुग्णांची संख्या अतिशय चिंतादायक आहे, दरम्यान रुग्णांना अनेक आरोग्य सेवेंचा तुटवडा सहन करावा लागत आहे. सध्या राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर औषधाचा तुटवडा तर आहेच. पण त्या सोबत राज्यात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेस ची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे डॉक्टर्स आणि नर्सेस ची कमतरता आता भासू लागलीय.

करोनाच्या काळात राज्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना दोन ते तीन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळावरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात काही ठिकाणी कोविड सेंटर उभे करण्यात आले आहे; परंतु पुरेशा मनुष्यबळाअभावी ते कार्यान्वित होऊ शकले नाही. त्यामुळे राज्यात काही शहरात खासगी कंपन्यांकडून वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे लागत आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर, आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत या शैक्षणिक वर्षात एकूण 5 हजार 247 विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करत आहेत. हे एमबीबीएस डॉक्‍टर आणि सुमारे दीड हजार परिचारिका असे मनुष्यबळ इंटर्नशिपद्वारे करोना काळात राज्य सरकारकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे वैद्यकीय रुग्णालयावरील होणारा ताण कमी होण्याची चिन्हे आहे. त्यादृष्टीने या सर्वांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ही माहिती दिली.

राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयातून नुकतीच मेडिकलची पदवी घेतलेले 5 हजारांहून अधिक डॉक्‍टर कोविड रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर म्हणून काम करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. एवढेच नव्हे, तर राज्याच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून सुमारे एक हजार ते बाराशे परिचारिकांना करोना काळात रुग्णांच्या देखभालीसाठी आवश्‍यक प्रशिक्षण देऊन तयार केले जात आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आलेला कामाचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

त्यादृष्टीने विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे. मेडिकलचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना एक वर्ष इंटर्नशिप करणे अनिवार्य आहे. या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप केल्याशिवाय त्यांना मेडिकलची पदवीप्रमाणपत्र मिळत नाही. मात्र, करोनाच्या संकट काळात याच विद्यार्थ्यांना इंटर्नशिपद्वारे राज्य सरकारच्या मदतीसाठी पुढे येणार आहेत. लवकरच सर्व विद्यार्थी रुग्ण सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याचे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

दरम्यान, येत्या 24 एप्रिलपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण केले जाईल. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह अनेक तज्ज्ञांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहेत. त्यामुळे काही दिवसांत हे सर्व मनुष्यबळ करोनाच्या संकटकाळात रुग्णालयात काम करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like