कोविड वॉर्डमध्ये लागलेल्या आगीत 50 रुग्णांचा होरपळून मृत्यू

इराक । इराकमधील एका रुग्णालयात कोव्हिड आयसोलेशन वॉर्डात लागेल्या आगीमुळं 50 हून अधिक जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. इराकच्या नसिरिया शहराच्या दक्षिणेला असलेल्या अल हुसैन रुग्णालयात ही आग लागली होती. सोमवारी रात्री उशिरा या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. अद्याप आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र एका ऑक्सिजन टँकच्या स्फोटानंतर आग पसरल्याचा अंदाज प्राथमिक तपासानंतर वर्तवला जात आहे.

दरम्याण, इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांनी या प्रकरणी रुग्णालयाच्या प्रमुखांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णांचे नातेवाईक या मुद्द्यावर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याचं वृत्त हाती येत आहे.

तसेच आग लागलेला नवीन वॉर्ड हा तीन महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला होता. त्यात 70 बेडची व्यवस्था होती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. एका स्थानिक आरोग्य अधिकार्‍यानं दिलेल्या माहितीनुसार आग लागली त्यावेळी या वॉर्डात किमान 63 लोक होते. मला आधी कोरोना व्हायरसच्या वॉर्डात एक मोठा स्फोट ऐकायला आला. त्यानंतर भीषण आग दिसली, असं रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकानं सांगितलं. या घटनेनंतर अजूनही रुग्णांचा तपास घेणं सुरुच आहे.

इराकच्या संसदेचे सभापती मोहम्मद अल-हलबौसी यांनी या घटनेनंतर ट्वीट केलं. ही आग इराकच्या नागरिकांच्या प्राणांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा स्पष्ट पुरावा आहे. हे अपयश संपवण्याची ही वेळ आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं. यापूर्वी एप्रिल महिन्यात बगदादमध्ये एका रुग्णालयातही एका ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला होता. त्यात जवळपास 82 जणांचा मृत्यू झाला होता.

 

You May Also Like