प्रकल्पाच्या रखडलेल्या कामावरुन राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना एक पत्र

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी चिखलदरा येथील एका प्रकल्पाच्या रखडलेल्या कामावरुन राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना एक पत्र लिहीलं आहे. चिखलदरा पर्यटन स्थळावर सिंगल केबलवरचा देशातील पहिल्या स्कायवॉक निर्मितीचं काम हाती घेण्यात आलं आहे. पण त्याचं काम सध्या अर्धवट पडलेलं असल्यानं खासदार नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरे यांना साकडं घातलं आहे.

“चिखलदऱ्याला हजारो पर्यटक या ठिकाणी दरवर्षी येतात आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. याठिकाणी हातात घेण्यात आलेला सिंगल केबलचा स्कायवॉक अर्धवट स्थितीत आहे. आदित्यजी आपण राज्याचे पर्यटन मंत्री आहात. मुंबई, ठाणे, कोकणमध्ये पर्यटनाचा विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. जरा विदर्भाकडेही लक्ष द्या. शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला दिले आणि मोठ्या गतीने या महामार्गाचे काम केले जात आहे. हा स्कायवॉकही लवकरात लवकर पूर्ण होणार असेल आणि विदर्भाच्या पर्यटन व्यवसायास चालना मिळत असेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांचे जिल्हा अमरावतीमधील अचलपूर हे आजोळ असल्यामुळे या कामात आपण स्वत: लक्ष देऊन या कामाला गती द्यावी तसेच समृद्धी महामार्गाप्रमाणे या स्कायवॉकला माननीय शिवसेनाप्रमुखांचे नाव द्यायला देखील आमची हरकत नाही”, असं नवनीत राणा यांनी पत्रात म्हटलं आहे.

चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासाचा टर्निंग पॉइंट ठरेल अशा या स्कायवॉकचे काम पर्यटन मंत्री म्हणून आपण लवकरात लवकर पूर्ण करुन आदिवासी बहुल मेळघाट, चिखलदऱ्याला न्याय द्याल, तेथील गोरगरीब आदिवासींना वाढणाऱ्या पर्यटनातून रोजगाराची चांगली संधी मिळेल, अशी अपेक्षा करतो, असंही राणा यांनी म्हटलं आहे.

You May Also Like